Advertisement

इन्फंटच्या दानपेटीशेजारी सापडली ‘नकोशी’

प्रजापत्र | Sunday, 18/12/2022
बातमी शेअर करा

बीड : येथून जवळच असलेल्या पाली येथील एचआयव्हीग्रस्तांच्या इन्फंट इंडिया येथील दानपेटी शेजारी एक नकोशी सापडल्याचा प्रकार सायंकाळी 6 च्या सुमारास समोर आला आहे. इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता व संध्या बारगजे मतदान करुन इन्फंट इंडियावर परत आल्यानंतर ही घटना समोर आली. दरम्यान थोड्यावेळापूर्वी जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ.हनुमंत पारेख यांनी त्या बाळाच्या आरोग्याची तपासणी केली आहे.

 

बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथे एचआयव्हीग्रस्तांसाठी बारगजे कुटुंबियांनी इन्फंट इंडियाची स्थापना केली आहे. रविवारी बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतसाठी मतदान होते. त्यामुळे बारगजे कुटुंबिय मतदानासाठी गावाकडे गेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास ते इन्फंट इंडियाला परतल्यानंतर रस्त्यावरील एका दानपेटी शेजारी त्यांना ही चिमुकली मुलगी आढळून आली. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून जिल्हा रुग्णालयाचे डॉ.हनुमंत पारेख यांनी थोड्यावेळापूर्वी त्या मुलीची तपासणी केली आहे. सध्या तिची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती त्यांनी दिली. थोड्यावेळात पोलीसही घटनास्थळी दाखल होणार आहेत.

 

माणूसकीला काळीमा फासणारी घटना
एचआयव्हीग्रस्तांचे काटेरी जीवन सुखकर करण्यासाठी आम्ही इन्फंट  इंडियाची स्थापना केली. आज अनेक वंचितांना आम्ही हक्काचे घर दिले मात्र आज या नकोशीमुळे माझा जीव खुप हळहळला. बीड जिल्ह्यात सातत्याने अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. आम्ही इन्फंट इंडियाच्या खाली रस्त्यावर एक दानपेटी ठेवली आहे. त्यात अनेकजण नगदी रोकड, धान्य, कपडे ठेवतात. आज एक नकोशी सायंकाच्या सुमारास आम्हाला तिथे कपड्यात गुंडाळून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी असल्याची प्रतिक्रिया इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे यांनी प्रजापत्रशी बोलताना व्यक्त केली.

 

 

Advertisement

Advertisement