अंबाजोगाई - ताक आणण्यासाठी घरात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अंबाजोगाई अपर सत्र न्याधीश दिपक डी. खोचे यांनी अर्ध्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विकास नारायण कांदे (रा. सिरसाळा, ता. परळी) असे त्या आरोपीचे नाव आहे.
सदरील घटना गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सिरसाळा येथे घडली होती. आरोपी विकास नारायण कांदे हा सिरसाळा येथील रहिवाशी आहे. अल्पवयीन मुली विकासच्या गल्लीत राहणार्या असून त्या नेहमी प्रमाणे आरोपीकडे ताक आणण्यासाठी जात होत्या. त्या दोन पिडीता विकासच्या घरी ताकासाठी गेल्या असता त्याने पिडीताना घरात इतर कोणीही नसल्याचे संधी साधून रूम मध्ये नेवून दरवाजा बंद करून दोन चाकूचा धाक दाखवून दोरीच्या साह्याने हात पाय बांधून त्यांच्यावर अत्याचार केला. यावेळी विकासच्या आईचा फोन आल्यानंतर आईने घरात कोण रडत आहे असे विचारले असता विकासने टी व्ही मधील आवाज आहे असे खोटे सांगून पीडितांना सोडून दिले व कोणाला सांगितले तर जिवे मारुन तुकडे करून टाकीन अशी धमकी दिली. सदर फिर्यादी वरून आरोपी विरुद्ध सिरसाळा येथे गुन्हा नोंद करून आरोपी विरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालय, अंबाजोगाई येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरण हे आरोपीस तुरुंगात ठेवून चालविण्यात आले. प्रकरणाचा तपास पो उप अधीक्षक एस. ए. पाटील यांनी केला.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने साक्षीपुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस अर्धी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व कलम 506 मध्ये सात वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले व त्यांना अॅड, नितीन पुजदेकर व अॅड इस्माईल गवळी यांनी मदत केली. तसेच पोलीस पैरवी म्हणून पो. हे का गोविंद कदम व पो हे का विष्णू नागरगोजे यांनी काम पाहिले.