मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ तीन महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सीआयडीचा तपास पूर्ण झाला असून मेटेंच्या कारचा चालक हाच अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मेटे बीडकडून मुंबईकडे येत होते. पहाटे पाच वाजता हा अपघात झाला होता. चालकाने मेटेंना तासभर मदतच मिळाली नसल्याचा आरोप केला होता. चालक एकनाथ कदम याने रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत, असे म्हटले होते.
आता हाच चालक दोषी असल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. विनायक मेटेंच्या कारचा चालक एकनाथ कदमवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीआयडीने रसायनी पोलीस ठाण्यात ३०४ a, 304 -2 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
कदम हा मेटेंची कार १४०-१५० किमीच्या वेगाने चालवत होता. भातन बोगद्याजवळ आल्यावर त्याने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने उजव्या बाजुच्या लेनमध्ये गाडी घातली. परंतू तिथे आणखी एक गाडी ओव्हरटेक करत होती. ओव्हरटेक करता येणार नाही हे समजल्यावरही त्याने त्या लेनमधून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे मेटेंची कार डाव्या बाजुने आदळली. सकृतदर्शनी कदम हाच मेटेंच्या अपघाती मृत्यूस आणि अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याला लवकरच ताब्यात घेऊन अटक करण्यात येणार आहे. गुन्ह्यात वापरलेल्या कलमांनुसार कदम याला दोन ते चार वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
सीआयडीच्या चौकशीत काय आढळलं?
विनायक मेटे यांची कार ज्या ज्या मार्गावरुन गेली होती तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज सीआयडी तपासत होती. याशिवाय आयआरबीचे इंजिनिअर्स आणि टेक्निकल अभियंते यांचं एक पथक तयार करुन त्यांचं मत जाणून घेण्यात आलं होतं की यामध्ये कोणाची चूक तुम्हाला दिसते?. सीआयडीने पाहिलेल्या फूटेजमध्ये हा चालक ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचं दिसत होतं. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच्या थोडा वेळ आधी चालक एकनाथ कदमने उजवा टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहित असूनही त्याने ओव्हरटेक केला आणि त्याचा परिणाम डाव्या बाजूला झाला आणि अपघात घडला. सीआयडीच्या तपासात या बाबी समोर आल्यानंतर त्यांनी रसायनी पोलिसांमध्ये विनायक मेटे यांच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.