मुंबईतील (Mumbai) गोवर (Measles) रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अशात मुंबईत गोवरचे एकूण 740 संशयित रुग्ण आहेत. यातील 50 रुग्ण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर एक रुग्ण गंभीर असून व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून (BMC) देण्यात आली आहे.
मुंबईत कसा वाढतोय गोवरचा विळखा?
मुंबईतील गोवरचा उद्रेक बघायला मिळत आहे. मुंबईतील 12 विभागात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. मागील एका दिवसात मुंबईत गोवरचे 123 संशयित रुग्ण आढळले आहेत. अनेक संशयित रुग्णांना मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील संसर्गजन्य रोगाच्या उपचारासाठी असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात 50 बालकं उपचार घेत असून एक मूल व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे.
गोवरचा मुंबईला विळखा
- सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली.
- ऑक्टोबर महिन्यात गोवरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली.
- गोवंडीतील 3 बालकांच्या मृत्यूमुळे गोवरचा उद्रेक समोर आला.
- त्यानंतर पालिकेकडून उपाययोजनेस सुरुवात करण्यात आली.
- साडे पाच हजारांहून अधिक गोवर आणि रुबेलासंबंधी लसीकरण करण्यात आले.
आतापर्यंत गोवंडीत सर्वाधिक रुग्ण
हा संसर्गजन्य आजार असल्याने आणि बालकांना अधिक होत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबई महानगरपालिकेने यासाठी विशेष लसीकरण मोहीम सुरु केली आहे. नऊ महिन्यांचे बालक आणि 16 महिन्यांच्या बालकांना गोवर प्रतिबंधक लस दिली जाते.
मुंबईत गोवरचा अधिक प्रसार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीकडून मुंबईतील अनेक विभागात ठिकठिकाणी आढावा घेण्यात येत आहे. मुंबईत अचानक रुग्णसंख्या का वाढली? याची अद्याप माहिती आरोग्य विभागातून देण्यात आलेली नाही. मात्र, आपल्या राज्यात आणि काही राज्यांमध्येही गोवरचे रुग्ण आढळून आल्याने मुंबईत त्याचा अधिक प्रसार झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, आपल्या पाल्यांना जपा. कोणतीही लक्षणं आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा आणि लसीकरण केलं नसल्यास लसीकरण करु घ्या.
काय काळजी घ्यावी?
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु करावेत. आरोग्य तपासणीत संशयित रुग्णांना व्हिटामिन ए दिलं जातं.
- लहान बालकांचा आहार चांगला ठेवा आणि स्वच्छता देखील राखावी
- निदानासाठी रक्त आणि लघवीचे नमुने घेतले जातात, स्वॅबद्वारे चाचणी देखील केली जाते
- चाचण्यांच्या आधारे गोवर किंवा रुबेलाचे निदान करण्यास मदत होते
- बालकांचे लसीकरण झालेले नसल्यास डॉक्टरांच्या मदतीने घरोघरी जात सर्वेक्षणामार्फत तपासणी आणि आढावा