Advertisement

बोगस प्रमाणपत्राआधारे नोकरी मिळविणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

प्रजापत्र | Sunday, 13/11/2022
बातमी शेअर करा

बीड: हंगामी फवारणी कर्मचारी असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करुन आरोग्य विभागात नोकरी मिळवण्याच्या प्रकरणात रविवारी बीडच्या शिवाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ५० पेक्षा  जास्त कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे. 
आरोग्य विभागातील एमपीडब्ल्यु पदासाठी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना आरक्षण आहे. बीड जिल्ह्यात हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे बनावट प्रमाणपत्र देणारे रॅकेट सुरु असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या. अखेर रविवारी त्याचा भांडाफोड झाला. आरोग्य उपसंचालक लातूर कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी ज्ञानदेव करवर यांनी शिवाजीनगर पोलीसात फिर्याद दिली आहे.  यात २०१७ ते २०२० या कालावधीत हंगामी फवारणी कर्मचारी असल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवून अनेकांनी नोकरी मिळविल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सध्या आरोग्य विभागाच्या सेवेत असलेल्या ५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सपोनि मनोजकुमार लोंढे करित आहेत. 

 

प्रमाणपत्र देणारांचे काय? 
या प्रकरणात आता आरोग्य विभागाने प्रमाणपत्र घेणारांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र असे प्रमाणपत्र देणारे रॅकेटच जिल्ह्यात कार्यरत असल्याचे वारंवार बोलले जात असताना आणि यात आरोग्य विभागातीलच काहींचे लागेबांधे असल्याचे बोलले जात असताना देखील आरोग्य विभाग यावर मौन पाळून आहे. त्यामुळे आता हे रॅकेटच शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

 

Advertisement

Advertisement