अंबाजोगाई - गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) यांनी गुरुवारी (दि.०३) रात्री विशेष पथकाला पाठवून शहरातील बाराभाई गल्लीतील कत्तलखान्यावर छापा मारला. यावेळी कत्तलीसाठी आणलेल्या ६६ गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केल्याने त्यांचा जीव वाचला आहे. पोलिसांनी १२ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्लीतील नगर परिषदेच्या गाळ्यातील कत्तलखान्यातून चोरीछुपे नियमित अनेक गोवंशीय जनावरांची कत्तल केली जाते. गुरुवारी देखील या ठिकाणी कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरे आणल्याची माहिती गुप्त माहिती अपर अधीक्षक कविता नेरकर (पवार) यांना मिळाली होती. सदर माहिती गांभीर्याने घेत नेरकर यांनी त्यांच्या विशेष पथकातील एपीआय रवींद्र शिंदे, पोलीस कर्मचारी तिडके, दौंड, तागड, देवकते, सुरवसे, महिला कर्मचारी राठोड, गायकवाड, ग्रामीण ठाण्याचे पीएसआय केंद्रे, खंदारे, राउत आणि आरसीपीचे कर्मचारी यांना रात्री १०.३० वा. तातडीने बाराभाई गल्लीत पाठवून कत्तलखान्यावर छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या तब्बल ६६ गोवंशीय जनावरांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी एका पिकअप टेम्पोसह (एमएच २६ एच २३०९) एकूण १२ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळावर आढळून आलेल्या फय्याज अब्दुल करीम कुरेशी, अमीर मौला कुरेशी, लायक कुरेशी, मुक्तार कुरेशी, फारूक कुरेशी आणि दिशान हाफिज या सहा जणांवर पो.ह. अनिल दौंड यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, अपर अधीक्षक कविता नेरकर यांनी सतर्कता दाखवत ६६ जनावरांचा जीव वाचवल्याने शहरातील प्राणीमित्रांसह नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
जनावरांच्या बचावासाठी पोलीस रात्रभर धावले
पोलीस पथकाने छापा मारून जनावारंची सुटका केली तर खरी, परंतु त्यांना सुरक्षित स्थळी पाठवणेही गरजेचे होते. अर्ध्या रात्रीपर्यंत पोलिसांनी कत्तलखान्याच्या दुर्गंधीयुक्त वातवरणात बसून जनावरांचा सांभाळही केला आणि पंचनामाही केला. त्यानंतर जनावरांना टेंपोमध्ये घालून टप्प्याटप्प्याने वरवटी, परळी आणि घाटनांदूर यथील गोशाळेत सोडण्यात आले. पोलिसांचे हे काम शुक्रवार दुपारपर्यंत सुरु होते.