केज दि.२५(प्रतिनिधी) - तालुक्यातील जोला या गावातील ३१ वर्षीय तरूण शेतकरी गणेश मारूती सारूक यांची २ एक्कर सोयाबीन अतवृष्टीमुळे खराब झाली. यामुळे त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट ओढावलं होतं. सेवा सहकारी सोसायटीसह इतर खाजगी कर्जाचा मोठा डोंगर त्यांच्यावर होता.कर्जबाजारीपणाला कंटाळून या तरुण शेतकऱ्याने आज दुपारी १:०० च्या दरम्यान स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर परिवाराला घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मोठा हंबरडा फोडला. ऐन दिवाळीचा सण सुरू असतानाच परिवारावर हा दु:खाचा डोंगर कोसळला यामुळे ऐन दिवाळीत परिवार पोरका झाला आहे.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.या घटनेनंतर दगडाचं काळीज असलेल्या प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून या घटनेची गांभीर्याने दखल घेतली जाणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर सरकार परिवाराला मदत करणार की वाऱ्यावर सोडाणार ? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे.