केज - सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना राजेगाव ( ता. केज ) येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. संतोष अशोक दौंड असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
राजेगाव ( ता. केज ) येथील शेतकरी संतोष अशोक दौंड ( वय ४० ) यांना पत्नीसह तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्य असून शेतीच्या उत्पन्नांवर ते आपल्या कुटुंबाची गुजराण करीत होते. शेतात दरवर्षी सोयाबीन पीक घेत असून काढणीच्या वेळी पडत असलेल्या पावसाने सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन पदरात उत्पन्न पडत नसल्याने हताश होतात. यंदा ही परतीच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याने सततच्या नापिकीमुळे सोसायटीचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे ? आणि थोरली मुलगी लग्नास आल्याने तिच्या लग्नासाठी खर्च कोठून करायचा ? या विचाराने हताश होऊन संतोष दौंड यांनी टोकाची भूमिका घेतली. शनिवारी पहाटे पत्नी, मुली झोपेत असताना शेत सर्वे नं. ४८ मधील माळ नावाच्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन संतोष दौंड या शेतकऱ्याने आपली जीवयात्रा संपविली.
या घटनेची माहिती मिळताच जमादार अभिमान भालेराव, जमादार अशोक मेसे, पोलीस नाईक रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उमेश अशोक दौंड यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.