भारतात ५ जी सेवा सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात २०० शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश करण्यात येणार असून येत्या ३१ मार्चपर्यंत ही सेवा मिळू शकेल. त्याकरिता पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील. त्याचबरोबर वंदे भारत रेल्वे कोचची निर्मिती लातूर येथील कारखान्यात करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सीएमआयएतर्फे आयोजित डेस्टिनेशन मराठवाडा- भारताचे भविष्य या कार्यक्रमात केली.
या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, राजेंद्र दर्डा, राजकुमार धूत, राम भोगले यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योजकांशी संवाद साधताना मंत्री वैष्णव म्हणाले, दिल्ली-मुंबई उद्योग कॉरिडॉरअंतर्गत येणारी ऑरिक सिटी ही देशातील पहिली स्मार्ट औद्योगिक वसाहत आहे.
ऑरिकच्या मार्केटिंगसाठी सीएमआयएच्या पुढाकारातून एक कृती समिती तयार करावी, गुंतवणुकीसाठी स्वतंत्र प्रेझेंटेशन आणि हेल्प डेस्क स्थापन करावे. जेणेकरून माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नवीन मोठ्या गुंतवणुकीसाठी मंत्रालय प्रोत्साहन देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नितीन गुप्ता, सचिव अर्पित सावे, उपाध्यक्ष दुष्यंत पाटील, उत्सव माछर, सौरभ भोगले, अथर्वेशराज नंदावत, ऋषी बागला, आशिष गर्दे, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, अभय हंचनाळ, राहुल मोगले, अनिल पाटील, अजिंक्य सावे आदी उपस्थित होते.
डेस्टिनेशन मराठवाडा- भारताचे भविष्य
मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सीएमआयएने डेस्टिनेशन मराठवाडा उपक्रमाची सुरवात केली. संस्थेचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी मराठवाड्याची क्षमता आणि विभागाच्या मागण्या मांडल्या. यात शहराला ५ जी शहर म्हणून विकसित करावे, ऑरिक येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी गुंतवणूक आणि डेटा सेंटरची स्थापना, ऑटोनोमस मोबिलिटी टेस्टिंग हब, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आणि सेमी कंडक्टर तंत्रज्ञान शिकवणारी राष्ट्रीय स्तरावरील संस्था, लातूर येथे वंदे भारत कोच निर्मिती आणि त्याला पुरवठा करणारा व्हेंडर पूल औरंगाबाद आणि मराठवाडा क्षेत्रात विकसित करावा, अशी मागणी केली.
मराठवाड्यात उद्योगांना मोठी संधी
वंदे भारत रेल्वेचा दुसरा टप्पा नुकताच राष्ट्राला अर्पण केला. स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली रेल्वे १८० किमी प्रतितास वेगाने धावू शकते. या पुढील टप्प्यातील रेल्वेचे कोच आता लातूर येथील रेल्वे कारखान्यात तयार केले जातील. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे १६०० कोच निर्माण केले जातील. यासाठी १४००० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या कोचला लागणारे सुटे पार्ट आणि तंत्रज्ञानासाठी मराठवाड्यात एक चांगली इकोसिस्टिम आहे. यामुळे येथील उद्योजक, तरुणांना अनेक संधी आहेत. स्टार्टअप्सच्या मोठ्या गुंतवणुकीसाठी उद्योजकांच्या पाठबळाची आवश्यकता असल्याने सीएमआयएने पुढाकार घ्यावा, असे आवाहन वैष्णव यांनी केले.