अंबाजोगाई - येथील प्रतिष्ठित व्यापारी जितेंद्र झंवर (वय ४८) हे पत्नी आणि मुलीसह औरंगाबादहून अंबाजोगाईकडे येत असताना बीड जवळ कोळवाडी येथे त्यांच्या कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जितेंद्र झंवर यांची पत्नी ज्योती (वय ४६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, मुलगी रजत (वय १९) आणि स्वतः जितेंद्र हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी पहाटे दिड वाजताच्या सुमारास झाला.
जितेंद्र झंवर हे अंबाजोगाई येथील होलसेल केमिस्ट व्यापारी तथा पूजा डीस्ट्रीब्यूटरचे मालक आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच त्यांची पत्नी ज्योती यांनी टपरवेअरचा नवीन व्यवसाय सुरु केला होता. या व्यवसायाच्या संदर्भात कामासाठी ते पत्नी आणि मुलगी रजत यांच्यासह स्वतःच्या कारने (एमएच ४४ एस २९९०) गुरुवारी सकाळी औरंगाबादला गेले होते. तिथे सर्व काम आटोपून ते साडेअकराच्या सुमारास अंबाजोगाईला परत निघाले. प्रवास आणि दिवसभराच्या कामामुळे झोप येऊ लागल्याने जितेंद्र यांनी बीडच्या पुढे घाट ओलांडल्यावर एका हॉटेलसमोर थांबून थोडावेळ आराम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, घाट सुरु होण्यापूर्वीच कोळवाडी येथे दिड वाजताच्या सुमारास त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरील एका ट्रकला कार मागच्या बाजूने धडकली. या भीषण अपघातात एअर बॅग उघडल्याने जितेंद्र हे सुखरूप बचावले, मात्र शेजारी बसलेल्या त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर, मागील सीटवर बसलेली त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, ज्योती झंवर यांच्या मृत्यूबद्दल अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.