Advertisement

वडील जिवंत आहेत तोपर्यंत आमची जमीन परत मिळवून द्या

प्रजापत्र | Thursday, 29/09/2022
बातमी शेअर करा

माजलगाव : कर्ज काढून लेकीचे लग्न लावले, मात्र दहाच दिवसात तिला नवऱ्याने सोडले. तर दुसरीकडे कर्ज फेडूनही सावकार जमीन परत देत नाही. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या लेकीने आता मदतीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. वडील जिवंत आहेत तोपर्यंत आमची जमीन परत मिळवून द्या असे आर्जव तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.  

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुजा शेखर सावंत ( 24, रा.कुप्पा, ता.वडवणी. ह.मु. पुनंदगाव ता.माजलगाव जि.बीड) या विवाहित तरुणीने मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले असून त्या पत्रात ती म्हणते की, माझे शिक्षण सुरु आहे. नोकरी नसल्याने आई-वडिलांनी माझे लग्न करण्याचे ठरवले. दरम्यान, गावातील खाजगी सावकार मारोती लिंबाजी वाघमारे याने एक स्थळ आणले. राम बबन जाधव ( रा.काक्रंबा ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद , हल्ली मुक्काम पुणे ) चांगला मुलगा आहे, असे सांगून लग्न लावून देण्यासाठी दबाव आणला. 

 

तसेच तुमच्याकडे पैसे नसतील तर मी उसने देतो तुम्ही लग्नास होकार दया असे सांगितले. सावकार वाघमारेने 8 लाख 50 हजार रुपये व्याजाने दिले. लग्नाची तारीख जवळ येताच दोन एक्कर जमीन माझ्या मुलाच्या नावे करुन द्या अशी अडवणूक केली. नाईलाजाने पालकाने ३२ लाख रूपये किमतीची दोन एकर जमिनीचे तात्पुरते खरेदीखत करुन दिली. त्यानंतर माझे लग्न ४ एप्रिल २०२२ रोजी झाले. मात्र, लग्न झाल्यानंतर १० दिवसातच नवऱ्याने हाकलून दिल्याने मी माहेरी आले. 

 

दरम्यान, वडिलांनी सावकाराचे व्याजासह पैसे परत केले. मात्र, सावकार वाघमारेने जमिन परत करण्यास नकार दिला. यामुळे वडील खचले असून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. माझ्यामुळे आई-वडिलांपुढे मोठे संकट उभे राहिले नंसते, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुलीने पाठवले आहे. तसेच वडिल जिवंत आहेत तोपर्यंत आमची जमिन पतर मिळून द्या अशी मागणी केली आहे.

Advertisement

Advertisement