अकोला शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुपारीचा खर्रा खाताना एका व्यक्तीला ठसका लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधावरी (21 सप्टेंबर) उघडकीस आली. तसेच ठसका गेल्याने व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, दरम्यान तात्काळ व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नेमके प्रकरण काय?
अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या तुलंगा खुर्द गावात सचिन अविनाश आठवले (वय 36) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, युवकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनने सुपारीचा खर्रा खाल्ल्याने त्याला ठसका लागला. त्यामुळे त्याला श्वास घेणे कठीण झाले होते. हा प्रकार बघून सचिनला तत्काळ ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले. परंतु, येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूमुळे उपस्थित सर्वांना मोठा धक्का बसला. पोलिसांना घटनेची तत्काळ माहिती देण्यात आली.