अंबाजोगाई - घराचे पाच लाख रुपये दे म्हणत भावाने पत्नी आणि मुलाच्या मदतीने त्याच्या सख्ख्या भावाला विषारी औषध पाजल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी येथे मंगळवारी (दि.१३) दुपारी घडली.
भरत मधुकर घाडगे (वय ४०, रा. दस्तगीरवाडी) असे त्या विषबाधा झालेल्या भावाचे नाव आहे. भरत यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी दुपारी ते शेतातील गोठयासमोर झोपले होते. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास त्यांचा भाऊ रामचंद्र मधुकर घाडगे, भावजई सावित्रीबाई रामचंद्र घाडगे व शिवशंकर रामचंद्र घाडगे हे तिघे त्यांच्याजवळ आले. तू घराचे पाच लाख रुपये दे, तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्या तिघांनी संगनमताने भरत यांना बळजबरीने कुठलेतरी विषारी औषध पाजले. भरत यांच्यावर सध्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर कलम ३०७ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी रामचंद्र आणि सावित्रीबाई घाडगे या दोघांना ताब्यात घेतले असून शिवशंकर अद्याप फरार आहे. पुढील तपास एपीआय सावंत करत आहेत.