Advertisement

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील दोन तरुण ठार

प्रजापत्र | Saturday, 13/08/2022
बातमी शेअर करा

केज दि.१३ - अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना केज - कळंब रस्त्यावरील सुर्डी फाटा येथील विसावा हॉटेलसमोर शुक्रवारी ( दि. १२ ) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. प्रकाश साहेबराव घोडके ( वय ३५ ) व संदीप श्रावण घोडके ( वय २२ ) दोघे रा. चिंचोली माळी ता. केज अशी अपघातात मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. 

 

      केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील प्रकाश साहेबराव घोडके ( वय ३५ ) व संदीप श्रावण घोडके ( वय २२ ) हे तरुण बांधकाम मिस्त्री म्हणून काम करीत होते. दिवसभराचे काम आटोपून शुक्रवारी ( दि.१२ ) रात्री दुचाकीवरून ( एम. एच. ४४ वाय. ९९७९ ) कळंबहून ( जि. उस्मानाबाद ) गावाकडे निघाले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी ही केज - कळंब रस्त्यावरील सुर्डी फाट्यावर असलेल्या विसावा हॉटेलसमोर आली असता भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक देत चिरडले. या अपघातात प्रकाश घोडके व संदीप घोडके हे दोघे गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. तर धडक देणाऱ्या वाहन चालक हा घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, फौजदार शेखर औटे, सहाय्यक फौजदार रामधन डोईफोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत.

 

     दरम्यान, दोघांचे मृतदेह हे केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. शनिवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर प्रकाश घोडके याच्या मृतदेहावर शेतात व संदीप घोडके याच्या मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकाश घोडके हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहिणी आहेत. तर संदीप घोडके याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परीवार आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Advertisement

Advertisement