(किरण धोंड)
परळी वैजनाथ - तालुक्यातील मरळवाडी येथील शेतकरी काशीनाथ आघाव यांचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, त्यांच्या कुटुंबियांना वन विभागाच्या नियमानुसार अर्थसहाय्य करण्याबाबत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार आज वन विभागाच्या वतीने आघाव कुटुंबियांना एकूण १५ लाख रुपयांच्या अर्थसहाय्यचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
एकूण 15 लाख रुपये रक्कमेपैकी शासन निर्णयाप्रमाणे मयत आघाव यांच्या वारसदारांना 5 लाख रुपये रोख (धनादेशद्वारे) व उर्वरित 10 लाख रुपये मुदत ठेव (फिक्सड डिपॉझिट) स्वरूपात प्रदान करण्यात आले. काशिनाथ आघाव यांच्यावर 18 जुलै 2021 रोजी मरळवाडी येथून परळीकडे दूध घेऊन येत असताना रानडुक्कराने हल्ला केला होता, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून सदर कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी वन विभागाकडे पाठपुरावा केला होता.
तर दुसऱ्या एका घटनेमध्ये परळी तालुक्यातील बोधेगाव येथील गणपत शिंदे यांच्यावर शेतात गुरे राखत असताना रानडुक्कराने केलेल्या हल्ल्यात कायमचे दिव्यांगत्व आले होते. शिंदे यांना वन विभागाने शासन निर्णयाप्रमाणे देय असलेल्या 5 लाख रक्कमेपैकी 1 लाख 25 हजार रुपयांचे वितरण याआधी केले होते. मात्र त्यांना मिळणारे मदतीचे 3 लाख 75 हजार रुपये देयक बाकी होते. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार सदर देयक देखील आज अदा करण्यात आले असून, या रक्कमेचा धनादेश आज श्री. मुंडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मिक कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, विष्णुपंत देशमुख, रवी मुळे, वन विभागाचे अधिकारी भगवान गित्ते यांसह आदी उपस्थित होते.