परळी वै.दि.१ (वार्ताहर)-बारा ज्योतिर्लिंगा पैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैजनाथाच्या मंदिरात सोमवारी (दि.१) पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली होती. कोरोना काळामध्ये सलग दोन वर्षे श्रावण महिन्यात भाविकांना वैजनाथाचे दर्शन घेता आले नव्हते. सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
‘हर हर महादेव’चा जयघोष करत परळी येथील वैदयनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने आज मंदिर परिसर फलून गेला. पहिल्याच श्रावणी सोमवार निमित्ताने वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात यासह अन्य राज्यातील भाविक वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत दाखल झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात सुमारे ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.दरम्यान वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर लोखंडी बॅरीकेट लावण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठी दर्शन रागांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.