परळी वै.दि.२९ (वार्ताहर)-परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणारा खडका बंधारा १०० टक्के भरला असून तुडुंब भरून ओसंडून वाहत आहे. जायकवाडीचे पाणी सोडण्यात आल्याने या बंधाऱ्याचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा पूर्ण ओसंडून वाहत असल्याने परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. अखंडित वीजनिर्मिती करण्याच्या दृष्टीने ही अतिशय समाधानाची बाब आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसाने तसेच जायकवाडीचे पाणी सोडण्यात आल्याने सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा ओसंडून वाहत आहे. बुधवारी (दि. २८) १३ पैकी ९ दरवाजे रात्री उघडून पाणी सोडण्यात आले. नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा भरल्याने या बंधाऱ्याखालील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला याच ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे परळी वीज केंद्रासह सोनपेठ तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.