Advertisement

कोरोनामुळे रजा मिळालेले खुनाच्या गुन्ह्यातील दोन कैदी कारागृहात परतलेच नाहीत

प्रजापत्र | Thursday, 28/07/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - खुनाच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्याखाली औरंगाबादच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील दोन कैद्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ४५ दिवसांची अभिवचन सुटी (पॅरोल) मिळाली. मात्र, मुदत उलटूनही हे दोन्ही कैदी कारागृहात परतले नाहीत. त्या दोघांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

 

 

 संजय ज्ञानोबा नरवडे (रा. वाघाळवाडी) आणि प्रदीप लालासाहेब बनसोडे (रा. लोखंडी सावरगाव) अशी त्या कैद्यांची नावे आहेत. दोन वेगवेगळ्या खून प्रकरणात संजय नरवाडे २०१३ पासून तर प्रदीप बनसोडे हा २०१९ पासून औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर २०२० साली त्या दोघांना सुरुवातीस ४५ दिवसांच्या आकस्मिक अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी त्यांना रजेत ३० दिवसांची वाढ देण्यात आली. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर यावर्षी १६ मे पासून त्यांच्या रजा रद्द करण्यात येऊन तत्काळ कारागृहात हजर होण्याबाबत आदेश बजावण्यात आले होते. मात्र, ते दोघेही अद्यापपर्यंत कारागृहात हजर झाले नाहीत. अखेर कारागृहाच्या वतीने दोन्ही कैद्यांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. 
 

Advertisement

Advertisement