Advertisement

बीड : एसीबीच्या कारवाईत अडकलेले सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईचे तत्कालीन कार्यकारी संजय कोकणे यांनी आता त्यांची एसीबीकडे तक्रार करणाऱ्या भगवान केदार यांच्यावर ब्लँकमेलिंगचा आरोप करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. भगवान केदार यांच्यावर दिव्यांग हक्क कायद्याखाली स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा किंवा आपल्याला गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

 

 

केज येथील भाजपचे तालुकाध्यक्ष असलेल्या भगवान केदार यांच्या तक्रारीवरून २२ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांना दुसऱ्याच दिवशी जामीन देखील मिळाला होता. आता या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे. कार्यकारी अभियंता कोकणे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पात्र पाठविले असून त्यात भगवान केदार हे ब्लॅकमेलर असल्याचे म्हटले आहे. त्यांचा माझ्या कार्यालयाशी काहीही संबंध नसताना किंवा त्यांचे कोणतेही काम माझ्याकडे नसताना त्यांनी खोट्या तक्रारी दिल्या. काही कंत्राटदारांना माझी अडचण झाली होती, त्यांनी त्यांनी कट करून भगवान केदार यांना पुढे केले आणि खोटे प्रकरण घडवून आणले असे कोकणे यांनी म्हटले आहे. तसेच त्यानंतरही आपल्यावर खोटी एनसी दाखल करण्यात आली , मी दिव्यांग असून कट करून मला फसविण्यात आल्याने भगवान केदार यांच्याविरोधात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांग हक्क कायद्याखाली गुन्हा दाखल करावा किंवा आपल्याला गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी असे कोकणे यांनी म्हटले आहे. आता या पत्रावर जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजर आहेत.

 

 

  कोकणेंनी नेमके काय म्हटलेय पत्रात ?

'माझ्यावर जी कारवाई झाली त्यातील तक्रारदार हा कुठल्याही संस्थेचा चेअरमन किंवा कंत्राटदार नाही, त्यामुळे त्याचे माझ्या कार्यालयात बिल प्रलंबित असण्याचा कसलंच संबंध नाही. तक्रारदार भगवान केदार हा सांगवी (सा ) ता. केज येथील रहिवासी असून तो राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. सदर तक्रारदार हा ब्लॅकमेलर असून ज्या कंत्राटदारांना मी या पदावर राहणे अडचणीचे वाटत होते, त्यांनीच कट करून ह्या तक्रारदारास पुढे करून एसीबीला कळविले . एसीबीने सदर तक्रारदाराचा व कामाचा काही संबंध आहे का याची खातरजमा न करता कारवाई केली ' असे आपल्या पात्रात संजय कोकणे यांनी म्हटले आहे.

 

 

आयुक्तालयातून कार्यवाहीचे निर्देश

दरम्यान कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी या पत्राच्या प्रति विभागीय आयुक्तांसह इतरांना पाठविल्यानंतर आयुक्तालयातून देखील या प्रकरणात नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement