किल्ले धारूर दि.11 जुलै - धारुर तालुक्यातही भगरीतून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. काल वडवणी तालुक्यात 60 ते 70 जणांना भगरीतून विषबाधा झाल्यानंतर हा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. धारुर तालुक्यातील जागिरमोहा येथील एकाच कुटूंबातील दहा जणांचा विषबाधितांत समावेश आहे.
वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे भगर सेवन केल्यानंतर 60 ते 70 जणांना उलटी व जुलाबाचा त्रास झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. यातच रविवारी रात्री धारुर (Dharur) तालुक्यातही असाच प्रकार उघडकीस आला असून भगरीतून विषबाधा (Food poisoning) होवून एकाच कुटूंबातील 10 जणांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार रविवारी आषाढी एकादशी निमित्त जागिर मोहा येथील फाटे कुटूंबियांनी भगर सेवन केली होती. संध्याकाळी या सर्वच लोकांना मळमळ होणे, चक्कर येथे, उलटी होण्याचा त्रास सुरु झाला. यानंतर फाटे कुटूंबियांना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यामध्ये विजय फाटे (वय 14) कोमल फाटे (वय 16 वर्ष) लक्ष्मण फाटे (वय 10 वर्ष) पूजा फाटे (वय 13 वर्ष) अश्विनी फाटे (वय 32 वर्ष) सुनिता फाटे (वय 25 वर्ष) भारती फाटे (वय 7 वर्ष) इंदुबाई फाटे (वय 60 वर्ष) बालासाहेब फाटे (वय 28 वर्ष) दिगंबर फाटे (वय 30 वर्ष) यांचा समावेश आहे. या रुग्णांवर वैद्यकीय अधिक्षक (Medical Superintendent) डॉ. चेतन आदमाने यांनी तात्काळ उपचार सुरु केले.
आषाढी एकादशी निमित्त जवळपास सर्वच घरात उपवास केला जातो. यासाठी साधारणपणे भगर, शाबूदाण्याचा वापर होत असतो. मात्र भगरीमुळे अनेकदा विषबाधेचे (Food poisoning) प्रकार घडले आहेत. वडवणी तालुक्यानंतर आता धारुर तालुक्यातही भगरीतून विषबाधा होण्याचा प्रकार घडला. किराणा दुकानात जुनाट झालेल्या भगरीतून असा विषबाधेचा प्रकार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिक्षक (Medical Superintendent) डॉ. चेतन आदमाने यांनी केले आहे.
( Food Poisoning from Bhagari in Dharur taluka also; Affected from the same family. )