Advertisement

दागिने, दुचाकीसाठी दोन विवाहित महिलांना छळ करीत घराबाहेर काढले

प्रजापत्र | Friday, 29/04/2022
बातमी शेअर करा

 केज दि.२९ - एका विवाहितेस माहेरहून २२ तोळ्याचे दागिने घेऊन येण्यावरून तर दुसऱ्या विवाहितेस माहेरहून दुचाकीसाठी ५० हजार घेऊन येण्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करीत दोन्ही महिलांना घराबाहेर काढल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात दोन्ही घटनेतील पतींसह सासरच्या दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

 

 

    युसुफवडगाव येथील पांडुरंग दादाराव राऊत यांची कन्या अनिता हिचा विवाह प्रवीण गोपीचंद एडके ( रा. सोनाई ता. नेवासा जि. नगर ) याच्याशी २०१८ मध्ये झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर तिचा पती प्रवीण एडके, सासू सुरेखा एडके, सासरा गोपीचंद एडके, दिर अमोल एडके, बाबासाहेब भगत यांनी संगनमत करून अनिता हिस माहेरहून २२ तोळे सोने घेऊन येण्यासाठी तगादा लावला. मात्र तेवढे सोने घेऊन येण्यास नकार दिल्याने तिला सतत शिवीगाळ व मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ केला. सोने घेऊन ये तेव्हांच घरात घेऊ असे म्हणत घरातून हाकलून दिले. अशी फिर्याद अनिता प्रवीण एडके या विवाहितेने दिल्यावरून पती प्रवीण एडके, सासू सुरेखा एडके, सासरा गोपीचंद एडके, दिर अमोल एडके, बाबासाहेब भगत या पाच जणांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भगवान खेडकर हे करीत आहेत. 

 

 

        दुसऱ्या घटनेत केज तालुक्यातील उंदरी हे माहेर असलेल्या रमा सुमित क्षिरसागर या महिलेचा विवाह सुमित क्षिरसागर ( गादवड ता. मुरुड ) याच्याशी झालेला असून त्यांना एक मुलगी आहे. दुचाकी घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये ये म्हणून पती सुमित क्षिरसागर, सासरा अशोक क्षिरसागर, सासू शिला क्षिरसागर, पूजा सरवदे, चंद्रकांत सरवदे यांनी तगादा लावत व चारित्र्यावर संशय घेऊन मागील एक वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करीत घरातून हाकलून दिले. अशी फिर्याद रमा क्षिरसागर यांनी दिल्यावरून पती सुमित क्षिरसागर, सासरा अशोक क्षिरसागर, सासू शिला क्षिरसागर, पूजा सरवदे, चंद्रकांत सरवदे या पाच जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संपत शेंडगे हे करीत आहेत. 
 

Advertisement

Advertisement