Advertisement

राणा दाम्पत्याच्याविरोधात बीडमध्ये तक्रार

प्रजापत्र | Sunday, 24/04/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२४ (प्रतिनिधी)-मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचन करणार असे म्हणत ५०० समर्थकांसह चाल करून जाणार अशा आव्हान देणाऱ्या बातम्या दिवसभर सुरू होत्या. यातून सामाजिक तेढ निर्माण करणे आणि अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता. या गोष्टीचा निषेध करून राणा दाम्पत्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार युवासेनेचे राज्यसचिव विपुल पिंगळे आणि युवासेना जिल्हाधिकारी सागर बहीर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

 

       बीडमध्ये युवासेनेचे सचिव विपुल पिंगळे, युवा जिल्हाधिकारी सागर बहीर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करून राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, शनिवारी आम्ही टिव्हीवरील बातम्या बघत असताना दिवसभर हनुमान चालिसा पठणासाठी राणा दाम्पत्य ५०० समर्थकांसह मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानी जाणार असल्याचे आव्हान देत होते. सामाजिक तेढ आणि अराजकता माजवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे आमच्या निदर्शनास आले. सायंकाळी राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर आपल्या निवासस्थातून ते बाहेर पडताना शिवसेनेला दंगल घडवण्याच्या उद्देशाने भडकावण्यासाठी आक्षेपार्ह हातवारे करत होते. आ.रवी राणा आणि खा.नवनित राणा यांना खार पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर ठाण्याबाहेर असलेल्या लोकांना उद्देशून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करत होते. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. महाराष्ट्रातील शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आ.रवी राणा आणि खा.नवनीत राणा यांच्याविरोधात आमची कायदेशीर तक्रार आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
 

Advertisement

Advertisement