Advertisement

चालत्या वाहनावर चढून चोरी करणाऱ्या दोघांना पाठलाग करून पकडले

प्रजापत्र | Tuesday, 19/04/2022
बातमी शेअर करा

केज दि.१९ -  महामार्गावरुन धावणाऱ्या चालत्या वाहनावर चढून त्यातील माल चोरणाऱ्या  दोघांना सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

 

 

             मागच्या अनेक दिवसां पासून केज तालुक्यातील शिंदी फाटा आणि कोरेगाव दरम्यान धावत्या वाहनावर चढून धारदार शस्त्राने ताडपत्री फाडून अन्नपदार्थ आणि इतर वस्तूंच्या चोऱ्या होत होत्या.मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशा वरून स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि जोगदंड, मंगेश भोले, अशोक नामदास, महादेव बहीरवाळ आणि दिलीप गित्ते यांच्या पथक दि. १९ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजल्या पासून कोंबिग ऑपरेशन केले. त्यात पहाटे ६:१५ वा. च्या दरम्यान पोलीस पथक चोरट्यांचा शोध घेत असताना केज-बीड महामार्गावर सावंतवाडी पाटीजवळ असलेल्या टोल नाक्यावर तीन इसम संशयित रित्या आढळून आले. पोलिसांना पहाताच ते तीन इसम पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस पथकाने महादेव कल्याण पवार, सुंदर चंदर पवार, बबन कल्याण पवार यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. त्यात महादेव कल्याण पवार , सुंदर चंदर पवार या दोघांना ताब्यात घेतले तर बबन कल्याण पवार हा पळून गेला.

 

 

                       पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून दि. १९ एप्रिल रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं.  १२६/२०२२ भा. दं. वि. ४०१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.

         दरम्यान, चोरी करताना चालत्या वाहनातून उतरता वेळी मार लागू नये म्हणून चोरटे एकावर एक चार ते पाच पॅन्ट आणि त्याच्या मागील बाजूस टायरचे रबर लावून ते वापरत असलेले साहित्य आणि ताडपत्री फाडण्यासाठीची धारदार कत्ती पोलिसांनी ताब्यात घेतली.

Advertisement

Advertisement