केज - अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्यामुळे पित्याने रोडरोमिओला जाब विचारला. यावेळी चिडलेल्या त्या रोडरोमिओने मुलीसोबत लग्न लावून दे, अन्यथा तुझा खून करील अशी धमकी पित्याला दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणाने पित्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पित्याचा आज सकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
रमेश एकनाथ नेहरकर (वय ४५, रा. पिसेगाव, ता. केज) असे त्या मृत पित्याचे नाव आहे. रमेश नेहरकर हे साने गुरुजी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळेत सेवक म्हणून काम करत होते. भागवत संदीपान चाटे (रा. तांबवा, ता. केज) या तरुणाने रमेश नेहरकर यांच्या सतरा वर्षीय मुलीचे फोटो सोशल मीडियावर वायरल केले होते. याचा जाब रमेश नेहरकर याने विचारातच भागवतने तुझ्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दे अन्यथा खून करेल, अशी धमकी दिली होती. शनिवार (दि.९) कळंब येथून रमेश नेहरकर आपल्या दुचाकीवरून (एमएच ४४ एफ ४८३२) केजकडे येत होते. वाटेत दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेख फरीद बाबा दर्गा आणि संत सेना महाराज मंदिराच्याजवळ भागवत चाटे आणि त्याच्या दोन साथीदारांनी नेहरकर यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरु केला.
दरम्यान, भागवतने धावत्या दुचाकीवरील नेहरकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. अचानक झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले नेहरकर रस्त्यावर कोसळले. त्यानंतर भागवत दोन्ही साथीदारासह केजच्या दिशेने निघून गेला. जखमी नेहरकर यांना पाहून नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस नाईक अशोक नामदास यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी रमेश नेहरकर यांना रुग्णवाहिकेतून केज येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने नेहरकर यांना अधिक उपचारासाठी लातूर येथे एका खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान आज सकाळी नेहरकर यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात रमेश नेहरकर यांची पत्नी पुष्पा नेहरकर यांच्या तक्रारीवरून शनिवारी भागवत चाटे आणि दोन अनोळखी यांच्याविरुद्ध गु. र. नं. ११४/२०२२, भा. दं. वि. ३०७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज नेहरकर यांचा मृत्यू झाल्याने आरोपी भागवत चाटे व त्याच्या दोन साथीदारांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिनही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मिसळे करीत आहेत. या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली असून मुलींची आणि त्यांच्या पालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याची चर्चा होत आहे.