केज दि.१५ – तालुक्यातील पैठण येथील सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवाने संचालक मंडळाला विश्वासात न घेता जास्तीचा पगार घेऊन व कर्जदार सभासदांकडून केलेल्या कर्ज वसुलीचा भरणा न करता २ लाख ६९ हजार ९०९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखा परीक्षकांच्या तपासणीत उघड झाले आहे. त्यावरून लेखा परीक्षकांच्या फिर्यादीवरून सोसायटीचे सचिव राजेंद्र विठ्ठल गायकवाड याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
q
याबाबत अधिक माहिती अशी की, एतेसामोद्दीन नवाबोद्दीन काझी ( रा. लोहार गल्ली, बीड ) हे सेवानिवृत्त लेखा परीक्षक असून त्यांची सन – २०१५ ते ३१ मार्च २०२२ या वर्षासाठी लेखा परीक्षक म्हणून सहकार आयुक्त पुणे यांनी निवड केली आहे. काझी यांनी केज तालुक्यातील पैठण येथील सेवा सहकारी सोसायटीचे १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीचे लेखा परीक्षण केले असता त्यात सोसायटीचे सचिव राजेंद्र विठ्ठल गायकवाड यांनी पदाचा गैरवापर करीत त्यांना ७ हजार रुपये मासिक वेतन असताना त्यांनी सोसायटीच्या संचालकांची मंजुरी न घेता १० हजार रुपायांप्रमाणे जादा वेतन घेऊन ८५ हजार रुपयांची जास्तीची रक्कम घेत अपहार केल्याचे उघड झाले. तसेच कर्जदार सभासदांकडून १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वसूल करण्यात आलेल्या १ लाख ८४ हजार ९०९ रुपायांची रक्कम ही जिल्हा बँकेच्या युसुफवडगाव शाखेच्या खात्यावर भरणा करणे आवश्यक असताना या रक्कमेचा भरणा केला नसल्याचे ही उघड झाले. सोसायटीचे सचिव राजेंद्र गायकवाड यांनी जास्तीच्या वेतनातून ८५ हजार रुपये व कर्ज वसुलीची १ लाख ८४ हजार ९०९ रुपये असा २ लाख ६९ हजार ९०९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखा परीक्षकांच्या तपासणीत उघड झाले. अशी फिर्याद एतेसामोद्दीन नवाबोद्दीन काझी यांनी दिल्यावरून सोसायटीचे सचिव राजेंद्र विठ्ठल गायकवाड ( रा. बनसारोळा ता. केज ) याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामधन डोईफोडे हे पुढील तपास करत आहेत.