धारूर - केजला जाण्याच्या बहाण्याने पवार नामक व्यक्तीसह चौघांनी शुक्रवारी (दि.०४) सायंकाळी नानासाहेब महारूद्र तुपसौंदर (रा .एकता नगर, पाथरी, जि. परभणी) याची कार (एमएच २२ यू ७९४४) पाथरी येथून भाड्याने ठरवली. रात्री ९.३० च्या सुमारास ते धारुरच्या घाटात आले असता त्यांनी लघुशंकेच्या बहाण्याने कार थांबवली. त्यानंतर नानासाहेबला रस्त्याच्या खाली घेऊन बेदम मारहाण केली आणि बळजबरीने कारच्या मागील सीटवर बसवले. त्याचे कपडे काढून तारेने हातपाय बांधले आणि एटीएम कार्ड, रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला. तसेच, जीवे मारण्याची धमकी देत एटीएम आणि गुगल पेचा पासवर्ड विचारून घेतला. त्यानंतर नानासाहेबला नित्रूड येथील ढाब्याच्या पाठीमागे हातपाय बांधलेल्या अवस्थेत फेकून दिले आणि त्याची कार, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण ५ लाख १६ हजार ३०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. याप्रकरणी त्या चार चोरट्यांवर धारूर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
बातमी शेअर करा