भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. आज सकाळी ८.१२ मिनिटांनी त्यांचे निधन झाले.
राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊन सरकार याविषयी निर्णय घेत असतं. त्यामुळेच लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे.
राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर…
– ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.
– राष्ट्रध्वज किती दिवस या स्थितीत राहील याचा निर्णय फक्त राष्ट्रपती घेतात.
– सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते.
– शासकीय सन्मान प्राप्त व्यक्तीचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात येते.
– अंत्यसंस्कारावेळी बंदुकांची सलामी देण्यात येते.