किल्लेधारूर दि.16 जानेवारी – धारुर (Dharur) तालुक्यातील तेलगाव जवळ बीड परळी महामार्गावर परळीकडुन भरधाव वेगात येणाऱ्या स्वीप्ट डिझायर गाडीची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसुन भिषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी तेलगाव येथे घडली.
(Accident at Telgaon in Dharur taluka; Two were killed and one was seriously injured when a speeding car hit a tree.)
नांदेड जिल्ह्यातील भोकर (Bhokar) येथील तीन तरूण रविवारी एम. एच.13 सीके 0441 या स्वीप्ट डिझायर गाडीने भोकर येथुन तेलगाव मार्गे बीडला जात असताना तेलगाव येथे भिषण अपघात झाला. तेलगाव येथील परळी रोडवर असलेल्या अमर बिअरबार जवळ सदर गाडीच्या चालकाचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रोडखाली खड्यात असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन भरधाव धडकली.
गाडी एवढ्या जोरात धडकली की जोराचा आवाज होवून पुर्वेकडुन येणाऱ्या गाडीचे धडक बसताच मोठ्या वेगाने फिरून गाडीची समोरील तोंड उत्तरेकडे झाले. या अपघातात चालक व चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेला तरूण जागीच ठार झाले. तर मागच्या सिटवर बसलेला तरूण समोरच्या व मागच्या सिटमध्ये अडकला. मयत व जखमी नांदेड (Nanded) जिल्ह्यातील भोकरचे असुन, नेमके कुणाचे नाव काय आहे याची ओळख पटत नाही.
तरीही त्या तरूणांच्या मोबाईलवर आलेल्या फोनच्या अंदाजावरून मयतात युनुस शेख व सचिन मोकमपल्ले यांचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवला जात असुन अमोल वाघमारे हा तरूण गंभीर जखमी झाल्याचे समजते. त्या तरूणाचे पाय मोडला. गावालगतच अपघात झाल्याने अमर बिअरबारचे मालक कांता पाटील लगड हे इतर नागरिकांना घेऊन तात्काळ घटनास्थळी गेले.
अपघात (Accident) झाल्याचे समजताच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु ते बाहेर काढता येत नव्हते. त्यामुळे गॅस वेल्डिंग ने वेल्डिंग करून, एका मयतास बाहेर काढले. तर जखमी व अन्य एका मयतास जेसीबीच्या सहायाने पोलीस (Police) कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले.
यानंतर मयत व जखमींना 108 रूग्ण वाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड तसेच जेसीबी (JCB) मालक मच्छिंद्र माने तसेच शेकडो नागरिकांनी माणुसकी दाखवत गाडीतील मयत व जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढत एका जखमी तरूणाचा जीव वाचला.