बीड : ज्याला कुठलीही सामाजिक पार्श्वभूमी नाही परंतु ज्याच्याकडे प्रतिभा आहे अशा व्यक्तींच्या प्रतिभेची हत्या करणार्या प्रवृत्ती समाजात खूप आहेत. मला देखील अशा प्रवृत्तींनी खूप त्रास दिला. प्रतिभेची हत्या करू पाहणारी ही व्यक्ती देशाच्या मूळ तत्वाला विलक्षण घातक आहे. आज हजारो लोक याचे बळी पडताहेत. पण त्याच्याही विरोधात संघर्ष करत ठामपणे उभे राहता आले पाहिजे. मी तो प्रयत्न केला. या शब्दात नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, इतिहास लेखक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून वावरणारे डॉ.सतिष साळुंके यांनी आपला प्रवास प्रजापत्र समोर उघड केला.
डॉ.सतिष साळुंके. महाराष्ट्राच्या नाट्यक्षेत्रात आदराने घेतलेलं नाव. ज्या कुटुंबात कला म्हणजे काय असते हे देखील माहित नव्हतं अशा कुटुंबातला हा तरूण बीडच्या मातीत जन्मतो आणि अगदी दिल्लीपर्यंत आपला दबदबा निर्माण करतो. कुठलाही पूर्वइतिहास नाही, कोणता परंपरेचा पायीक नाही पण अगदी स्वत:च्या जीवावर, प्रत्येक वळणावर टोकाचा संघर्ष करत यांनी केवळ स्वत:चंच व्यक्तीमत्व घडविलं नाही तर अनेक कलाकार सतिष साळुंकेच्या माध्यमातून नाट्यसृष्टीला मिळाले. त्यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा मनोवेध.
प्रश्न-सतिष साळुंके म्हटलं की समोर शिक्षक, कलाकार, दिग्दर्शक, इतिहास लेखक अशी अनेक रूपं येतात पण सतिष साळुंकेचं खरं रूप नेमकं कोणतं आहे?
डॉ.सतिष साळुंके-अनेकांना स्वत:च्या जन्माचं कारण कळत नाही. त्याबाबतीत मी मात्र नशीबवान आहे. मला शाळेतच चांगले शिक्षक, शिक्षिका लाभल्या. ज्यामुळे मी जन्माला कशासाठी आलोय हे मला कळलं. मी नाटकाचं मन असलेला माणूस आहे. तो माझ्या स्वभावाचा भाग आहे. हे मला कळलं.तसं तर मी प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला तपासून घेण्याचा, सिध्द करण्याचा प्रयत्न केला. मी इतिहासकार नाही. इतिहासाचा अभ्यासकही नाही. तरीही बीड जिल्ह्याचा इतिहासावर लिहिलं. हे सगळं खरं असलं तरी जेंव्हा सतिष साळुंके कोण? असा प्रश्न विचारला जातो त्यावेळी मी खर्या अर्थानं नाटकातला माणूस आहे हेच उत्तर असतं. आणि मला नाटकातला माणूस म्हणूनच ओळखावं अशी माझी इच्छा आहे.
प्रश्न-नाटकाकडं कधी वळलात?
डॉ.सतिष साळुंके-नाटकाची आणि माझी ओळख शाळेत असताना झाली. तसं मी विलक्षण गरीब कुटुंबातला. कुटुंबात व्यसनाचं प्रमाणही मोठं. त्यामुळे घरातल्यांना पोरगं शिकण्यापेक्षा संध्याकाळची चूल पेटण्यासाठी त्यानं काम करणं चांगलं वाटायचं. अशा कुटुंबातला मी शाळा, कॉलेजमध्ये असताना हुशार विद्यार्थी कधीच नव्हतो. ढ म्हणा हवं तर. मी सहावीला असताना त्यावेळच्या स्पर्धेमध्ये अंतरशालेय नाटक स्पर्धेसाठी माझी निवड झाली. आम्ही आहुती नावाचं नाटक बसविलं. मला त्यात बक्षीसही मिळालं. चित्राबाई जोशी या आमच्या शिक्षिका होत्या. त्यांचं माझ्या जीवनावर फार मोठा प्रभाव. मी पहिल्यांदा त्यांनी निवडल्यामुळेच नाटकात आलो.
प्रश्न-पण नाटकात काम करावं असं का वाटलं?
डॉ.सतिष साळुंके-आम्ही राहायला अशोक टॉकीजच्या बाजूला होतो. अशोक टॉकीजच्या बाजूच्या गटारावर आमचं घर होतं. त्यामुळे सिनेमातले डायलॉग सारखे ऐकू यायचे. हे काहीतरी वेगळं आहे असं वाटायचं आणि आपणही हे करू शकतो असं जाणवत राहायचं. त्यातून नाटकाची ओढ लागली. शाळेत चित्राबाई जोशींना ज्यावेळेस मला निवडलं. मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं. सर्वांनी कौतुक केलं. टाळ्या वाजविल्या आणि मी टाळ्या घेवू शकतो हे कळालं. आमच्या शिक्षिकेने देखील तुझ्यात वेगळेपण आहे हे मला सांगितलं. खरं तर मी बाईंना नेहमी आईच म्हणतो. आई ज्या व्यक्तीला जन्म देते ते शरीर नाशवंत असतं पण शिक्षक ज्या व्यक्तीमत्वाला जन्म देतात ते व्यक्तीमत्व शाश्वत असतं. त्यांच्या प्रयत्नातूनच मला माझ्यातला मी कळाला.
प्रश्न-मग पुढच्या प्रवास कसा झाला?
डॉ.सतिष साळुंके-शाळेत नाटकं करत होतो. मग नट म्हणून ओळख व्हायला लागली. माझी प्रतिमा बदलायला लागली. स्टेजवर उभं राहायचं आकर्षण निर्माण झालं. त्यावेळी गल्लीमध्ये मेळे व्हायचे. माईकसमोर बोलायचो. त्यातूनच आत्मविश्वास वाढत गेला. वक्तृत्व स्पर्धामध्ये सहभागाला सुरूवात केली. मी पहिल्यांना महात्मा गांधीवर भाषण दिलं. त्यावेळी काहीच कळत नव्हतं पण बोललो. त्यावेळी आम्हाला मिसाळ सर होते. त्यांनी मला 50 पैशांचं बक्षीस दिलं. आणि पुढे हे सुरूच झालं.
प्रश्न-आपण नाटकं लिहायला सुरूवात कशी केली?
डॉ.सतिष साळुंके-मी बलभीम महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी पहिल्यांदा मला विद्यापीठात युथ फेस्टिव्हल नावाचा काही प्रकार असतो आणि त्यात एकांकीका होतात हे माहित झालं. बलभीम महाविद्यालयात मी मला एकांकिकेत सहभाग घ्यायचा आहे म्हणून गेलो मात्र तिथल्या निवड समितीनं नावं अगोदरच ठरलीत असं सांगितलं. मी प्राचार्यांना भेटलो. त्यांनी निवड समितीतल्या प्राध्यापकांना विचारलं पण त्यांनाही नावं अगोदरच ठरतील असं सांगितलं. मला हे सारं प्रचंड खटकलं. हिदी माझी व्दितीय भाषा होती मग मराठीत नाही तर हिंदीत नाटक करू असं मनानं घेतलं आणि त्यासाठी मी स्वत:च ‘सवाल दर सवाल’ ही हिंदी एकाकिंका लिहिली. ती माझी पहिली एकांकिका. ती प्राचार्यांना दाखविली. त्यांनाही फार वेगळं वाटलं. आमच्या मानधने सरांना ही एकांकिका फार आवडली. विद्यापीठासाठी विद्यार्थी लेखकानं लिहिलेलं हे पहिलं नाटक होतं. विशेष म्हणजे आपल्याला मराठीत डावललं गेल्याचा संताप होता आणि माझ्यावर अन्याय झाल्याची माझ्या मित्र परिवाराची भावना होती. त्यामुळे मला सर्वांनीच साथ दिली. संगीता चपळगावकर, दिपक चितलांगे, सुलोचना मोलपवार, शरद खडके आदीनी माझ्यासोबत त्या नाटकात काम केलं आणि ते नाटक पहिलं आलं. दीडशे दोनशे नाटकांमधून आम्हाला बक्षीस मिळालं. मग पुढच्या वर्षी पूर्ण सत्य नावाची मराठी एकाकिंका लिहिली. त्यातही अभिनयाचं गोल्डमेडल जब्बार पटेलांच्या हस्ते मिळालं. नंतर वासुदेव मुलाटेंनी ‘द कन्स्ट्रक्शन’ नावाची एकांकिका बसविली त्यातही पारितोषिक मिळालं. हे सर्व होत असताना एक लक्षात येत होतं की आपल्याला अभिनय करायचा असेल तर तशी तोडीची कथा पाहिजे आणि मग ती नसल्याने मी स्वत:च लिहायला सुरूवात केली. अंधार वेडा होतोय, मला चौकट उद्वस्त करायचीच, तीला सापडलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ अशा अनेक एकांकिका लिहित गेलो.
प्रश्न-तुम्ही महाविद्यालयाच्या बाहेरही नाटकं करत होता?
डॉ.सतिष साळुंके-होय. आपण नाटकात चांगलं काम करू शकतो हे लक्षात आल्यानंतर आम्ही अॅक्टीव्ह ग्रुपची स्थापना केली. ते वर्ष 81-82 चं असेल. मग आम्ही बाहेर वेगवेगळ्या स्पर्धांना सुरूवात केली. त्यातून माझ्यातला कार्यकर्ता जागा व्हायला लागला. मग आम्ही नाट्य प्रशिक्षण शिबिरं सुरू केली.त्यातूनच मकरंद अनासपुरे, प्रसाद बिवरे, बाळू सौंदतीकर अशी माणसं हाती लागली. त्यावेळी चेटकीणीची फजिती हे नाटक बसविलं. त्याचा आम्ही व्यावसायिक प्रयोग संगम हॉलला केला. मुलगी झाली हो हे नाटक बसविलं. पुढे 1992 ला पहिलं अखिल भारतीय दलित नाट्यसंमेलन नाशिकला झालं. त्याचं मला निमंत्रण आलं. तिथे मी लिहिलेलं आणि दिग्दर्शीत केलेलं ‘अंतयात्रा’ हे नाटक आम्ही सादर केलं.
प्रश्न-आपण मुळचे कलाकार पण स्क्रीप्ट लिहिण्यात आणि दिग्दर्शन करण्यात हा कलाकार कुठंतरी बाजूला पडला का?
डॉ.सतिष साळुंके- हे पहा ग्रुप चालवायचा तर कुठंतरी आपल्यालाही कधीतरी बॅकफुटवर रहावं लागतं. सगळ मीच करेन असं म्हणून भागत नाही. म्हणून मी लेखन, दिग्दर्शन करत इतर अनेकांना पुढे संधी दिली. तरीही काही चांगली नाटकं असतील तर मी काम करायचो. मी, प्रशांत सौंदतीकर, नयना सिरसट यांनी मिळून आपलं बुवा असंय, मोरूची मावशी, पुनर्युध्द अशी नाटकं केली पण नंतर नंतर अभिनयापेक्षा दिग्दर्शनाची आवड वाढली.
प्रश्न-मग परिवर्तन प्रतिष्ठान कसं सुरू झालं?
डॉ.सतिष साळुंके-आमचा अॅक्टीव्ह ग्रुप चांगला चालला होता. कला हा सामुहिक आविष्कार असतो हे खरं असलं तरी ग्रुपमध्ये एखाद्याची जास्त ओळख होत असते. जेंव्हा माझी ओळख जास्त व्हायला लागली तेंव्हा काही लोकांनी ती संस्थाच फोडली. त्यावेळी मी विचार केला अॅक्टीव्ह ग्रुप पण आपणच उभा केला होता. आता आपण दुसरी संस्था उभी करू आणि त्यातून परिवर्तन संस्था उभी राहिली.
प्रश्न-हा प्रवास कसा होता?
डॉ.सतिष साळुंके-मी तसा बेरोजगार होतो. घरची गरीबी होती. अशा परिस्थितीत एखादी नवी संस्था उभी करणं फार अवघड होतं. पण माझा संपर्क शक्तीकुमार केंंडे सरांसोबत आला. त्यांनी मला संस्था उभारण्यात, माझ्या व्यक्तीगत आयुष्यात विलक्षण मदत केली. त्या काळात त्यांनी जी साथ दिली ती अवर्णनिय होती. ते नसते तर कदाचित खूप प्रश्नांना सामोरं जावं लागलं असतं. परिवर्तन मध्ये त्यांचाच जास्त वाटा आहे. यावर्षी परिवर्तनला 25 वर्ष होतायत. या 25 वर्षात परिवर्तननं अनेक कार्यक्रम घेतली. आम्ही श्रमदान शिबिरं घेतली. पथनाट्य केली. व्याख्यानमाला घेतल्या. यात द.मा.मिरासदार, शिवाजी सावंत, निर्मलकुमार फडकुले, निळू फुले, गो.रा.खैरनार अशा अनेकांनी हजेरी लावली. परिवर्तनवर प्यारेलाल गोहेल सरांचाही मोठा प्रभाव आहे. मला एक वैचारिक दिशा देण्याचं काम गोहेल सरांनी दिलं.
प्रश्न-आपण सांगितलं की आपल्या घरात शिकण्यापेक्षा संध्याकाळची चूल कशी पेटायची ते महत्वाचं होतं. मग तुमच्या या उचापतींना घरच्यांनी सहन कसं केलं?
डॉ.सतिष साळुंके-सहन करण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्या घरात, नाटक, कला, कलाकार हे कळण्यासारखं वातावरणच नव्हतं पण मुळात कुटुंबच मी चालवायचो. हे सर्व करत असतानाही सकाळी 5 वाजता उठायचो. 200-250 कपडे धुआयचो. ते वाळायला ठेवायचो. कॉलेजवरून आल्यावर इस्त्री करायचो. 25-30 वर्ष ते सुरू होतं. त्याशिवाय घर चाललंच नसतं. स्वत:चा विकास का परिवार यामध्ये मी परिवाराला अग्रक्रम दिला. एकदा एका नाटकातली माझी भूमिका पाहून तत्कालिन प्राचार्य बी.बी.शिंदे यांनी मला तू एन.एस.डी मध्ये जा तुझा सर्व खर्च कॉलेज करील असंही सांगितलं. पण माझ्यावर घरची जबाबदारी होती. दुसरा एक प्रसंग. मी एम कॉम साठी नवगण महाविद्यालयात होतो. आम्ही एक नाटक बसविलं त्याची वेळ संध्याकाळी सहाची होती. त्यावेळी बीडमध्ये सर्कस आलेली होती आणि सायंकाळी 5 वाजता अचानक साठ-सत्तर कपडे इस्त्रीला आले. इकडे नाटकाची वेळ व्हायला लागलेली. मला निरोप येऊ लागले. परंतु कपडे इस्त्री झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही असं मी सांगितलं. मला हे वास्तवाचा भान कायम होतं. त्यामुळे कोणी विरोध करण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही.
प्रश्न-आपण बीड फेस्टिव्हलही सुरू केला होता? ते काय होतं?
डॉ.सतिष साळुंके-आम्ही परिवर्तनच्या माध्यमातून व्याख्यानमाला घेत होतो. त्यावेळी व्याख्यानांना फारशी गर्दी जमायची नाही. लोक मोजकेच यायचे म्हणून मग याला सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड देण्याच्या हेतूने बीड फेस्टिव्हल सुरू झाला. काही वर्ष आम्ही तो उपक्रम राबविला पण नंतर बंद करावा लागला.
प्रश्न-मग शिक्षक व्हावं असं का वाटलं?
डॉ.सतिष साळुंके-आम्ही एम.कॉम केलं. पण पुढं काय करायचं हे कोणालाच माहित नव्हतं. त्यावेळी बी.एड किंवा बी.पीएड केलं की नौकरी लागायची. बी.एड करणं तर शक्य नव्हतं. तसा मी कॉलेजला असताना फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्सचा खेळाडू होतो त्यामुळे बी.पीड केलं. त्यानंतर गोयल सरांनीच बी.पीएड केलंय तर आता संस्कार शाळेत नौकरी कर असं सांगितलं आणि चारशे रूपये महिन्यावर मी रूजू झालो. नंतर तेथील विद्यार्थ्यांची प्रतिभा पाहून मी एम.ए. हिंदी केलं.
प्रश्न-आपण काही काळ पत्रकारिताही केली?
डॉ.सतिष साळुंके-परिवर्तन प्रतिष्ठानच्या सुरूवातीच्या काळात शक्तीकुमार केेंडे यांनी मला मदत केली होती. त्यावेळी मी त्यांना मला पत्रकारितेत रस आहे. कोठेतरी नौकरी लावा असं सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला सुरूवातीला चंपावतीपत्र मध्ये लावलं. त्यानंतर लोकमत समाचार आणि महानगर मध्ये देखील मी काम केलं.
प्रश्न-इतिहास लेखनाकडे कसे वळलात?
डॉ.सतिष साळुंके-संस्कार मध्ये असताना सीसीआरटी चा परिचय झाला. शिक्षकांना प्रशिक्षित करून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत संस्कृतीचं संशोधन पोहोचविणारी ही संस्था मी आठ ते दहा वर्ष या प्रशिक्षणासाठी प्रयत्न करत होतो. दहा वर्षानंतर नंबर लागला. उदयपूरला गेलो. त्याठिकाणी गिरीषचंद जोशी यांचं भाषण झालं. मी सहजासहजी कोणाच्या प्रभावात येत नाही. पण जोशी सरांच्या भाषणानं संस्कृतीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. संस्कृतीकडे पाहण्याच्या बाबतीत आपण किती निरक्षर आहोत हे लक्षात आलं. कलेची देखील एक वेगळी संस्कृती असते. शिल्पांमध्ये एक वेगळी संस्कृती दडली आहे हे लक्षात आलं. आणि मग परत आल्यानंतर मी पहिल्यांदा कंकालेश्वरला गेलो. तिथली शिल्प वेगळी वाटायला लागली. नंतर अंबाजोगाईच्या मंदिरात गेलो. मी या सर्व शिल्पांंचे फोटो काढत होतो. ते शाळेत बोर्डवर लावत होतो. त्यातून विद्यार्थी प्रश्न विचारायला लागले आणि मग त्यांच्या उत्तरासाठी म्हणून मी बीड जिल्ह्याचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास हे पुस्तक लिहिलं. त्याला राज्याशासनाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर हैद्राबाद मुक्तीसंग्रामावर लिहिलं. तांम्रपट शिलालेख यावर लिहिलं. लिहिलं म्हणण्यापेक्षा ते होत गेलं.
प्रश्न-आयुष्यातला अविस्मरणीय क्षण कोणता?
डॉ.सतीष साळुंके-दोन घटना सांगता येतील. पहिली म्हणजे मी बीड जिल्ह्याच्या इतिहासावरचं पुस्तक लिहित होतो. त्याचं टिपण मी चार वेळा लिहिलं आणि फाडलं होतं. शेवटी त्याचा अंतिम मसुदा तयार झाला. तो औरंगाबादला छापायला दिला. नेमकं त्याचवेळी माझी पत्नी आजारी पडली. तिच्यावर देखील औरंगाबादला उपचार सुरू होते. या पुस्तकासाठीची माझी सारी धडपड तिनं अनुभवली होती. त्या दवाखान्यात असतानाच पुस्तकाची पहिली डमी प्रत हाती आली. मी दवाखान्यातच ती पत्नीला दाखविली आणि त्यानंतर काही दिवसातच माझ्या पत्नीचं निधन झाली. ती डमी प्रत मी दाखवू शकलो हा क्षण कधी विसरता येणार नाही. दुसरं म्हणजे मला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार. ज्या हातांना कपडे धुवून आणि इस्त्री करून घट्टे पडले ते हात मी ए.पी.जी. अब्दुल कलामांसारख्या राष्ट्रपतीच्या हातात देवू शकलो त्यावेळी मला माझ्या घट्टयांची आठवण झाली. हा क्षणही विसरात येण्यासारखा नाही.
प्रश्न-आयुष्यात एखाद्या गोष्टीची खंत आहे का?
डॉ.सतिष साळुंके-ही माझीच नाही तर माझ्यासारख्या अनेकांची खंत आहे. आपल्याकडे ज्यांच्याकडे प्रतिभा आहे पण सामाजिक पार्श्वभूमी नाही. त्यांची प्रतिभा मारण्याचा प्रयत्न सातत्याने होतो. मला जातीवादाने आजपर्यंत खूप त्रास दिला. मलाच नाही हा त्रास हजारो लोकांना सहन करावा लागतोय. ज्यांच्याकडे प्रतिभा आहे त्यांची प्रतिभा केवळ जातीच्या कारणातून ठेचण्याचा प्रयत्न होतो. ही एक प्रवृत्ती आहे. अशा प्रवृत्ती कधी जातीचा, कधी पैशाचा तर कधी आणखी कोणत्या गोष्टीचा आधार घेत असतात. मला या त्रासाला वारंवार सामोरं जावं लागलं ही खंत आहेच.
प्रश्न-आयुष्याच्या या टप्यावर जे कोणी प्रतिभावान आहेत त्यांना काय सांगाल?
डॉ.सतिष साळुंके-समाजात प्रतिभेची हत्या करू पाहणार्या प्रवृत्ती आहेत अशी परिस्थिती असली तरीसुध्दा जर तुम्ही तुमच्या भूमिकेशी पक्के बांधील असाल त्यासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी असेल अपमान पचवूनही ध्येय न सोडण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. या गुणांचा अभाव असेल तर मात्र विलक्षण मानसिक संघर्षाला समोरं जावं लागणार आहे.