Advertisement

जिल्हयात माफिया राजचा अजून कोणता पुरावा हवाय?

प्रजापत्र | Monday, 10/01/2022
बातमी शेअर करा

बीड-सरकारी अधिकाऱ्यांना जिल्हयात काम करणं सध्या कठीण झालयं,  खोटया बिलावर सहया करण्यासाठी धमक्या देणाऱ्या गुत्तेदारापासून संरक्षण मिळावं अशी मागणी करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येणं हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बीड जिल्हयात माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय, याला सत्तेचा पाठिंबा नाही कशावरून? असा सवालही त्यांनी केला आहे.दरम्यान कार्यकारी अभियंता यांच्या रिव्हॉल्व्हर प्रकरणाची सर्वात पहिली बातमी दैनिक प्रजापत्रने प्रकाशित केली होती.  

 

 

          अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. कंत्राटदार धमक्या देऊन, कटयार दाखवून बिलावर सहया घेतात, त्यामुळे  कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र पाठवून स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी केली आहे, हे धक्कादायक आहे. वास्तविक पाहता, अशा प्रकारे एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांवर अशी वेळ येणं खरंच दुर्दैव आहे. जिल्हयातील सत्ताधारी नेत्याचे नियंत्रण कसलेही  राहिले नाही, त्यामुळेच गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयात वाळू माफिया, गुटखा माफिया, चोरांना, गुंडांना अभय, खोटया केसेस दाखल करणे, गुन्हयात अडकवणे, व्यापाऱ्यांच्या एजन्स्या हडपणे, चांगल्या संस्थेवर दबाव टाकून प्रशासक आणणे असे प्रकार सत्तेचा गैरवापर करून सर्रास चालू आहेत. गुंडांना पाठिशी घातले जात असून जिल्हयात कायद्याचा कसलाही वचक राहिला नाही, त्यामुळे हे लोक आता मर्जीविरुद्ध जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. सर्वच विभागातले अधिकारी याला वैतागले असून जिल्हयात काम करणे त्यांना कठीण झाले आहे. पण तक्रार करायला कुणी धजावत नाही.  जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना हेच पाहिजे असल्याने  अधिकाऱ्यांवर रिव्हॉल्व्हर मागण्याची वेळ आली आहे, माफियाराज बोकाळल्याचा आणखी कोणता पुरावा हवाय? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे.

Advertisement

Advertisement