Advertisement

चार मुलांसह आईची विहिरीत उडी घेत आत्महत्या प्रकरण ; 'या' घटनेमागचे सत्य पोलिस तपासात आले समोर

प्रजापत्र | Sunday, 02/01/2022
बातमी शेअर करा

अंबड : जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील घुन्गार्डे हदगाव येथील एका विवाहितेने चार मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. या ह्रदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी, भक्ती, ईश्वरी, अक्षरा आणि मुलगा युवराज असे या घटनेत मृतांची नावे आहेत.

 

  दरम्यान याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पती चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करीत असल्यानेच गंगासागर अडाणी यांनी मुलांसह आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. ज्ञानेश्वर अडाणी पत्नी गंगासागर तीन मुली व एक मुलासह राहत होते. ज्ञानेश्वरला दारूचे व्यसन होते त्यामुळे पती-पत्नीत नेहमी वाद व्हायचे. शिवाय मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर व त्याची पत्नी यांच्यात नेहमीच वादावादी व्हायची. चारित्र्यावर संशय घेऊन ज्ञानेश्वर हा पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यानंतर गंगासागर या आपल्या तीन मुली व एका मुलाला घेऊन शेतात गेल्या. तिथे त्यांनी चारही मुलांना विहिरीत ढकलून स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

 

काल या प्रकरणात आत्महत्या केलेल्या गंगासागर अडानी यांची बहीण रेखा दहिवाल यांनी गोंदी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून आपल्या ४ मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारणारी आई गंगासागर हिच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून चारित्र्यावर संशय घेवून शारीरिक, मानसिक छळ करीत मारहाण केल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी ज्ञानेश्वर आडाणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Advertisement