World Migration Report: कोरोनानं अनेकांच्या आयुष्यात खूप अमूलाग्र बदल केले आहेत. यात स्थलांतर हा देखील एक बदल झाला आहे. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्टनुसार, कोरोना काळात 28 कोटी नागरिकांचे स्थलांतर झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतर झालं आहे. कोरोना नसता तर जगभरात २० लाखांहून अधिक स्थलांतर वाढलं असतं, असं देखील अहवालात सांगण्यात आलय.
लॉकडाऊन काळात रस्त्यावर निघालेले मजुरांचे जथ्थे स्थलांतरीतांचं भीषण वास्तव दाखवत होते. अनेकांना फाळणीत झालेल्या स्थलांतराची देखील आठवण झाली. अनेक मजूर दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमधून आपल्या मूळगावी परतत होते. गावाकडून शहरांकडे आलेल्या मजुरांनी पुन्हा घरचा रस्ता धरला होता. यामुळे भारतातील स्थलांतर आणि त्यांचे प्रश्न समोर आल्याने जागतिक स्तरावर असलेली याची व्याप्ती देखील कळली. अशात जागतिक स्थलांतर अहवाल प्रकाशित झाला आहे. यात स्थलांतरितांची संख्या 2020 मध्ये वाढून 28.1 कोटीपर्यंत जाऊन पोहोचली आहे, जी 2019 च्या आकडेवारीनुसार 27.2 कोटी होती.
2020 साली भारतामधून सर्वाधिक नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये जवळपास 30 लाखांच्या वर स्थलांतर झाले आहे. जे जागतिक तिसऱ्या क्रमांकाचे स्थलांतरणाचा कॉरिडॉर म्हणून समोर येत आहे. त्यानंतर अमेरीकेत भारतीयांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले असून सौदी अरबमध्ये देखील 25 लाखांच्या जवळपास भारतीय असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. भारतात देखील बांगलादेशमधून स्थलांतर झाल्याचे अहवाल सांगण्यात आले आहे. स्थलांतर केलेल्या यादीत भारत अव्वल आहे. त्यानंतर मेक्सिको आणि रशियाचा क्रमांक लागतो.
स्थलांतराची संख्या मोठी असली तरी दुसरीकडे निर्वासितांची देखील संख्या मोठी आहे. 2021 उजाडत असताना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जगभरात सध्या 26 कोटींहून अधिक निर्वासित आहेत. सर्वाधिक संख्या ही युद्धजन्य परिस्थिती अडकलेल्या सीरियातून झाली आहे. तेही तब्बल 80 लाख. त्यानंतर अफगाणिस्तान, दक्षिण सुदान आणि म्यानमार ह्या देशांचा क्रमांक लागतो. 2020 मध्ये नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे आंतरराष्ट्रीय स्थलांतर वाढले आहे. देशांतर्गत विस्थापनाबद्दल बोलायचं तर नैसर्गिक आपत्ती, मानवी संघर्ष आणि हिंसाचारामुळे 2019 च्या तुलनेत 2020 सालात संख्या मोठी आहे. 2019 मध्ये ही संख्या 31 कोटींच्या घरात होती तर 2020 मध्ये वाढून ही संख्या 40 कोटींच्या घरात पोहोचली आहे.
भारतात कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी आणि आर्थिक मंदीच्या भीतीने अनेक जण आपल्या गावाकडे परतले. वाहतुकीच्या तुटपूंज्या साधनातही जीवाची पर्वा न करता मूळगावी जाण्यासाठी धडपडत होते. एकविसाव्या शतकात माणसाचा वाढलेल्या प्रवासाचा वेग, संपर्काच्या क्रांतीमुळे स्थलांतरीतांचे अनेक पैलू समोर आलेत. त्यामुळे स्थलांतरीतांचे गणित समजून घेतल्याशिवाय माणसाला पर्याय नाही. ह्यासाठी भारताने देखील विचार करत स्थलांतरासंबंधी धोरणात्मक पावलं उचलणे गरजेचे आहे.