अशोक शिंदे
नेकनुर दि.१७-येथून जवळच असलेल्या वैतागवाडीमध्ये पती-पत्नीचा मृतदेह गुरुवारी (दि.१७) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. आज मृतदेहांचे उत्तरीय तपासणी अहवाल पोलिसांना मिळाले असून यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधी पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. नंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती नेकनूर पोलिसांनी दिली आहे.
नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे राजेश जगदाळे (वय-२५) व त्यांची पत्नी दिपाली राजेश जगदाळे (वय-२०) या दाम्पत्याचे मृतदेह राहत्या घरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. नेकनूर पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याचे अहवाल आज आले असून यात दीपालीचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेशने आधी दीपालीचा खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असे म्हटले आहे. याप्रकारणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून पती-पत्नीच्या वादातुन हा प्रकार घडला असावा असा अंदाज आहे.दीपालीचा 11 महिन्यापूर्वी विवाह झाला होता आणि ती सात महिन्याची गर्भावती ही होती. आता या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.