केज दि.13 - तालुक्यात उमरी येथे होत असलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी रोखला.
दि. १३ डिसेंबर रोजी केज तालुक्यातील उमरी येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात येणार असल्याची माहिती चाईल्डलाईनच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ही माहिती केज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिली. त्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी चाईल्ड लाईनचे प्रकाश काळे, सामाजिक कार्यकर्ते शरद गिराम यांच्या सोबत पोलीस जमादार उमेश आघाव हे त्या ठिकाणी गेले. पोलीसांना पहाताच सर्व मंडळी पळून गेली. लग्नाच्या तयारीसाठी लावलेला मंडप काढून टाकला. तसेच त्या नंतर ग्रामसेवक वाकळे यांना माहिती दिली. बालविवाह प्रतिबंधक कायद्या नुसार ग्रामसेवक यांनाही या प्रकरणी कळविले आहे.
अशा प्रकारे जर बालविवाह कुठे होत असतील तर ते रोखण्यासाठी चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल अशी माहिती प्रकाश काळे यांनी दिली आहे.
गेवराईत तालुक्यात ही कारवाई
गेवराई-तालुक्यातील टाकळगव्हन येथे सोमवारी होणारा बालविवाह रविवारी रोखण्यात आला, चाईल्ड लाईनच्या वतीने त्यांचे समुपदेशन करून त्यांना बालकल्याण समिती बीड येथे सादर केले .बालकल्याण समिती यांनी आई-वडील कडून १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे शपथपत्र लिहून घेतले. चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्व्यक रामहरी जाधव संगीता भराट, स्वप्नील कोकाटे यांच्या पुढाकारातून हा बालविवाह रोखण्यात आला.