केज दि.7 – तालुक्यातील जवळबन येथे ग्रामपंचायत च्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. परंतु सदरील गावाला जोडणारे सर्वच्या सर्व रस्ते अतिशय खराब झाल्याने व वारंवार अर्ज विनंत्या करूनही दुरुस्त न केल्याने गावातील सदरील प्रभागातील मतदारांसह उमेदवारांनी चक्क बहिष्कार टाकल्याने अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.
जवळबन येथील प्रभाग एकमधील एका ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. सदरील जागेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ डिसेंबर होती व मतदान २१ तारखेला होणार होते. परंतु सदरील गावाला चारी बाजूने म्हणजेच चंदन सावरगाव, बोरी सावरगाव, सारणी, सावलेश्वर इत्यादी ठिकाणावरून येणारे रस्ते पूर्णतः खराब झालेले आहेत. दुचाकी चालवणे सुद्धा कठीण झालेले आहे. सदरील रस्ते दुरुस्तीसाठी अनेकदा ग्रामस्थांनी अर्ज विनंत्या करूनही कसल्याच प्रकारची दखल घेतली गेलेली नाही.त्यामुळे गावकरी आक्रमक झालेले आहेत.
दरम्यान सदरील निवडणुकीवर बहिष्कार म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने ठराव घेतला असून त्या जागेसाठी एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नसल्याने निवडणूक कार्यक्रम ठप्प झालेला आहे.