केज दि.6 - पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय महिलेचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील लव्हुरी येथे घडली आहे. ज्योती ज्ञानेश्वर चाळक असे शेततळ्यात बुडून मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
लव्हुरी येथील ज्ञानेश्वर चाळक यांची शिवारातील शेत सर्वे १९८ मध्ये जमीन आहे. त्यांची पत्नी ज्योती ज्ञानेश्वर चाळक ( वय २८ ) ही महिला ६ डिसेंबर रोजी सकाळी शेतात गेल्या होत्या. त्या शेततळ्यावर पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेल्या. मात्र शेततळ्यातून पाणी काढीत असताना त्यांचा पाय घसरून शेततळ्यात पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे जमादार चाँदपाशा सय्यद, पोलीस नाईक धन्यपाल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने बाजाच्या साहाय्याने ज्योती चाळक यांचा मृतदेह शेततळ्याच्या बाहेर काढला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून या महिलेस दोन मुले आहेत. राजाभाऊ बजरंग चाळक यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करत आहेत.