Advertisement

व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून १८ लाख लंपास

प्रजापत्र | Sunday, 28/11/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-येथून मुंबईत खरेदीसाठी गेलेल्या व्यापाऱ्याला खासगी प्रवासी बसमधून उतरताच मारहाण करून त्याच्याकडील १८ लाखांची रोकड घेऊन चार जण फरार झाले. हा प्रकार शनिवारी (दि.२७) सकाळी साडे सातच्या सुमारास नवी मुंबईतील कळंबोली सर्कलवर घडला आहे. त्या जखमी व्यापाऱ्यावर सध्या मुंबईतील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.  

 

              संतोष जाधव (वय ३८, रा. अंबाजोगाई) असे त्या जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. ते सराफा व्यापारी असून त्यांचे अंबाजोगाईतील मंडी बाजारात सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. सोने खरेदीसाठी ते मुंबईला गेले होते. शनिवारी सकाळी ७.३० वाजता कळंबोली सर्कल वर ट्रॅव्हल्स मधून उतरले असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या चार आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकली. यानंतर चाकूने त्यांच्यावर वार करीत हातातील बॅग लंपास केली. यावेळी बॅगेत १८ लाख रूपयांची रोकड होती.

              

 संतोष जाधव हे हे नेहमी मुंबई मधून सोने खरेदी करून अंबाजोगाईकडे घेवून जातात. त्यामुळे ते अंबाजोगाईहून पैसे घेवून निघाल्याची माहिती आरोपींना मिळाली असल्याची शक्यता नाकारतां येत नाही. सध्या चार आरोपी फरार झाले असून या मध्ये अजून काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पनवेल डीसीपी झोन आणि क्राईम ब्रॅन्च संयुक्त तपास करीत आहेत. दरम्यान व्यापारी संतोष जाधव यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Advertisement

Advertisement