किल्लेधारूर दि.25 नोव्हेंबर - बुधवारी (दि.24) रात्री अकरा ते बाराच्या सुमारास बारामतीहून रायपुरकडे साखर घेवून जाणारा ट्रक धारुर घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात तीन जण जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र 548 सी वरील धारूर माजलगाव रस्त्यावर अवघड घाट आहे. मात्र अरूंद रस्ता असल्याने या घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांना घाटाचा अंदाज नसल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत.
गेल्या महिन्यात सोलापूर कडून सिंमेट भरून परभणी कडे जाणारे ट्रक क्र. एम. एच. 12 एन.एक्स. 4090 हे अवघड वळणावर कठडा तोडून खोल दरीत जवळजवळ दोनशे मिटर खोल कोसळला होता. या अपघातात गाडीचा चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. यासोबतच सलग दोन दिवस साखर वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात झाले होते.
बुधवार (दि.24) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धारुर घाटात पुन्हा अपघात घडला आहे. साखर घेवून जाणारा ट्रक (क्र. एम.एच. 34- बीजी 4615) खोल दरीत कोसळून अपघात घडला. या अपघातात जिवित हानी झालेली नाही. या अपघातात तुषार रविशंकर पुजम (31 वर्षे), भास्कर गजानन घुले (49 वर्षे) व संजय चंद्रभान ठाकरे (30 वर्षे), सर्व रा.वनी, जि.यवतमाळ जखमी झाले आहेत. यात एका जणाची प्रकृती चिंताजनक असून तिघांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई स्वा.रा.ति. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सतत होत असलेल्या अपघातामुळे धारुर घाट मृत्यूचा सापळा बनत आहे. घाट रुंदीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे. अपघाताची माहिती कळताच अपघातस्थळी धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन पाटील यांनी रात्रीस धाव घेतली. जखमीना धारुर ग्रामिण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी पुढे पाठवून पोलिसांनी मदतकार्य केले.