अंबाजोगाई दि.११ (वार्ताहर)-काल रात्री दहाच्या सुमारास अनंत मुंडे यांच्या आडतीसमोर सोयाबीनच्या २३६ कट्टे असलेला सहा चाकी टेम्पो क्रमांक एमएच २४ -एफ ५९६९ चोरट्यांनी पळविला असल्याची घटना घडल्याने मोंढा परिसरातील व्यापारी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . जवळपास साडे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार टेम्पो चा मालक अनिल सपाटे यानी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .
काल रात्री अनिल सपाटे यांनी आपल्या सहा चाकी टेम्पो मध्ये मोंढ्यातील २३६ कट्टे सोयाबिन परळी येथे नेण्यासाठी भरला होता. टेम्पो भरल्यानंतर नेहमीप्रमाणे अनंत मुंढे यांच्या आडतीसमोर लावून घरी गेला .पहाटे साडे पाच वाजता परळीला जाण्यासाठी अनिल मोंढ्यात आला असतांना रात्री उभा केलेला आपला टेम्पो चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले .त्याने तात्काळ सर्व मोंढा परिसरात पिंजून काढला मात्र त्यास टेम्पो कुठेच आढळला नाही.अनिल सपाटे यांनी आडत मालक अनंत मुंढे यांना टेम्पो चोरीला गेल्याचे सांगितले आणि अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. चोरीचा तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी नरहरी नागरगोजे हे करीत आहेत .