Advertisement

बीडमध्ये दोन शिक्षकांच्या घरी दरोडा

प्रजापत्र | Wednesday, 10/11/2021
बातमी शेअर करा

बीड :रात्रीचे जेवण करून घरात झोपलेल्या शिक्षकाच्या घराला लक्ष करत अज्ञात चोरट्याने हॉलच्या  दरवाज्याचा कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर घरामधून रोख रकमेसह सोने-चांदीच्या दागिन्यांची जबरी चोरी केल्याची घटना बीड शहरातील पिंपरगव्हण रोडवरील श्री रविशंकर मतिमंद शाळेजवळ आज पहाटे घडली. चोरट्यांनी या शिक्षकासह अन्य एकाच्या घराचे कुलूप तोडून नगदी रोख रकमेसह सोन्या – चांदीचे दागिने लंपास केले . ७ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या घटनेने या परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी श्वानपथकासह भेट दिली.

 

बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून छोट्या-मोठ्या चोऱ्यांसह जबरी चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत असून आज पहाटे शहरातील पिंपरगव्हण रोड लगत असलेल्या श्री रविशंकर मतिमंद शाळेजवळ दोन घर फोडल्याची घटना घडली. संतोष गोपीनाथ मेहेत्रे ( वय ४२ ) हे शिक्षक आपल्या परिवारासह रात्रीचे जेवण करून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी मेहेत्रे यांच्या हॉलचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. हॉलमध्ये असलेल्या कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी आतमधील राणी हार, मोहळ माळ, लॉकेट, कानातील रिंग, झुंबर, देवाची सटवाई, मणिमंगळसुत्र, कानातील जोड सह २५ हजार रोख रक्कम व मेहेत्रे यांच्या मेहुण्याचे गंठण, लॉकेट, अंगठी, कानातील वेल, कानातील झुंबर, कानातील फुलांसह सोने-चांदीचे दागिने लुटून नेले.

 

यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा याच गल्लीत राहणारे अजयकुमार उद्धवराव धोंगडे यांच्या घराकडे वळवला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातूनही सोन्याची अंगठी, रोख रक्कम असा ऐवज चोरला. सदरील दोन्ही शिक्षकांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल ७ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. सदरची चोरी सकाळी मेहेत्रे कुटुंब झोपेतून उठल्यानंतर उघडकीस आली तेव्हा त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली असता काल शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. श्वान पथकाला पाचारण केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement