किल्लेधारूर दि.23 अॉक्टोंबर - हुंड्यातील राहिलेले 2 लाख रुपये माहेरहून घेऊन येण्यासाठी सासरच्या लोकांनी अवघे चार महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा छळ केला. सततची मारहाण आणि छळाला कंटाळून अखेर त्या विवाहितेने गुरुवारी (दि.21) माहेर असलेल्या धारुर तालुक्यातील तेलगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या पतीसह सासू , सासरा , दिर आणि नणंदेवर दिंद्रुड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला.
माजलगाव तालुक्यातील मनुर येथील प्रतीक्षा राहुल राऊत डुकरे (वय 22 वर्ष) असे मयत विवाहितेचे नाव आहे. प्रतीक्षाचे वडील संतोष मारोती लगड यांच्या फिर्यादीनुसार , तिचे लग्न यावर्षी 4 जून रोजी राहुल रामराव राऊत (डुकरे) (रा . मनुर , ह.मु. माजलगाव ) याच्या समवेत झाले. लग्नाच्या वेळी हुंड्यातील 2 लाख रुपये देऊन उर्वरित 3 लाख दिवाळीपर्यंत देण्याचे ठरले होते. सुरुवातीचा एक महिना चांगला गेल्यानंतर हुंड्यात राहिलेल्या तीन लाखांसाठी पती राहुल, सासरा रामराव आश्रुबा राऊत , सासू सुदामती , दिर वैभव आणि नणंद पुजा यांनी तिचा छळ सुरु केला.
तिला सतत मारहाण करून उपाशी ठेऊ लागले. त्यामुळे संतोष लगड यांनी उसनवारी करून एक लाख रुपये जमा केले आणि 5 सप्टेंबर रोजी प्रतीक्षाच्या सासरी नेऊन दिले. त्यानंतर चारच दिवसांनी उर्वरित दोन लाखांसाठी प्रतीक्षाला बेदम मारहाण झाली. त्या मारहाणीमुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर संतोष लगड तिला माहेरी घेऊन आले.
माहेरी आल्यावर प्रतीक्षाने सासरच्या जुलुमाचा पाढा वाचला. अखेर सततच्या छळाला कंटाळलेल्या प्रतीक्षाने माहेरी असताना नातेवाईक शेतात गेल्याची संधी साधून गुरुवारी दुपारी 1 वाजेदरम्यान राहत्या घरी लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष लगड यांच्या फिर्यादीवरून राहुल रामराव राऊत ( डुकरे ) , रामराव आश्रुबा राऊत सुदामती रामराव राऊत, वैभव रामराव राऊत आणि पूजा रामराव राऊत यांच्यावर दिद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सहायक पोलिस निरिक्षक प्रभा पुंडगे करत आहेत.