किल्लेधारूर-उभ्या ट्रकला भरधाव वेगात आलेल्या कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात धारूरच्या तरुणासह चौघांचा मृत्यु झाल्याची घटना कर्नाटकमधील विजापुरपासून दहा कि.मी. अंतरावर बुधवारी (दि.२०) सकाळी घडली.घटनास्थळी कर्नाटक पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह कारच्या बाहेर काढले. या अपघातात एकाच कुटुंबातील पती,पत्नीसह मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
धारुर शहरातील कसबा विभागातील ताहेर मनसब पठाण (वय-३३) यांचा ट्रक मालवाहतूकीचा व्यवसाय आहे. मंगळवारी (दि.१९) मध्यरात्रीच्या सुमारास ते आपल्या ट्रक (क्र.एमएच १२ सीएच ३१६६) मधून उसतोड मजुरांची जनावरे घेवून कारखान्याकडे गेले. मात्र कर्नाटकमधील विजापुरपासून दहा कि.मी.अंतरावर पहाटे ट्रकमध्ये बिघाड आल्याने ट्रक रस्त्याच्या खाली पठाण यांनी उभा केला.यावेळी एका भरधाव वेगात आलेल्या एका कारने जोराची धडक दिली. यात ताहेर यांच्यासोबत शिक्षक त्यांच्या पत्नी आणि एका मुलाचा ही मृत्यु झाल्याची माहिती आहे.अद्याप त्या तीन मयतांची नावे समोर आली नसून मिळालेल्या माहितीनुसार गोवा येथे मयत शिक्षक म्हणून कार्यरत होते.ते आपल्या कुटूंबियांसह कर्नाटकातील गावी जात असताना झोपेच्या धुंदीत विरुध्द दिशेला उभ्या ट्रकला समोरुन धडकले.यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
घरातील कर्ता पुरुष गेला,अन कुटुंबावर डोंगर कोसळला
विजापुर येथील शासकीय रुग्णालयात अपघातातील मृतांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहेत. ताहेर पठाण यांच्या अकाली अपघाती निधनामुळे धारुर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. ताहेर हे अतिशय शांत हसतमुख असल्याने त्यांचा मित्रवर्ग मोठा होता. कोरोना काळात सर्व वाहतूक ठप्प झाल्याने नुकताच व्यवसायाला सुरुवात केली होती. संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी उचलणारा कर्ता गेल्याने कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली, आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे.