Advertisement

राजकिशोर मोदींचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित

प्रजापत्र | Sunday, 17/10/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-येथील नगराध्यक्ष तथा बीड जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकिशोर मोदी हे काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २१ ऑक्टोबर रोजी मुंबईत ४० प्रमुख कार्यकर्त्यांसह मान्यवरांच्या उपस्थित प्रवेश करणार आहेत. मोदी यांनी स्वकर्तृत्वावर अंबाजोगाई नगर परिषद २० वर्षांपासून आपल्या ताब्यात ठेवली आहे. गेल्या ३० वर्षांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात आपले राजकीय वलय त्यांनी निर्माण केले. सहकार,शिक्षण,सांस्कृतिक,समाजकारणाच्या माध्यमातून त्यांची ओळख सर्वदूर झाली आहे. दरम्यान काँग्रेसला ते सोडचिटी देणार असल्याने हा मोठा धक्का असणार आहे.  

             काँग्रेस पक्षात मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ,कॉटन फेडरेशन व काँग्रेस पक्षातील विविध पदांवर त्यांनी काम केले.महाविद्यालयीन जीवनापासून ते काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत.बीड जिल्ह्याची काँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम मोदींनी केले व पक्षश्रेष्ठींनी बीड जिल्ह्याच्या काँग्रेसची धुरा त्यांच्यावर सोपविली होती.केज विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने आमदारकीची संधी मोदींना उपलब्ध होऊ शकली नाही.गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात काम करणाऱ्या मोदींना विधान परिषदेची संधी दोन वेळा उपलब्ध झाली होती.मात्र दोन्ही वेळा ही संधी हुकली.बीड जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचे अनेक मातब्बर नेते असले तरीही काँग्रेस पक्षाला उभारी देवु शकले नाहीत.बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोदी यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज होती. आगामी नगरपालिका निवडणुकसाठी राजकिशोर मोदी यांचा राष्ट्रवादी प्रवेश महत्वाचा ठरणार आहे. तसेच एक नवा चेहरा पक्षाला मिळेल,या उद्देशाने शरद पवार यांनी पूर्वीच मोदींना हेरले होते.मात्र , मोदी योग्य वेळेची वाट पाहत असावेत अश्या चर्चाना सध्या उधाण आले आहे. राजकिशोर मोदी यांनी बीड जिल्ह्यात कुठेही काँग्रेसची सत्ता नसताना नगर परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवली व अंबाजोगाई काँग्रेसचा बालेकिल्ला निर्माण केला. पक्षाचा बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षात खा.रजनी पाटील यांचा राजकीय अडसर व काँग्रेस पक्षात राहूनही आपली विधान परिषदेची इच्छापूर्ती होत नसल्याने मोदी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत.मुंबईत जाऊन त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली असल्याचे समजते.या भेटीतूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट निवडली असावी.

Advertisement

Advertisement