वडवणी-तालुक्यातील चिंचाळा गावात मागच्या तीन दिवसांपासून साथीच्या आजाराचा उद्रेक झाला आहे.साडेतीन हजार लोकसंख्येच्या गावात १३६ जणांना डिसेंट्री (हगवण) ची लागण झाल्याने खळबळ उडाली.सुरुवातीला गावात गॅस्ट्रोची साथ असल्याचे सांगण्यात येत होते.मात्र आरोग्य विभागाच्या पथकाने भेट देऊन पाहणी केल्यानंतर ही साथ गॅस्ट्रोची नव्हे तर हगवणची असल्याचे समोर आले.याबाबत रविवारी (दि.१८) सायंकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी माहिती दिली आहे.
वडवणी तालुक्यातील चिंचाळा गावात मागच्या तीन दिवसांपासून जुलाब आणि उलटीच्या तक्रारी घेवून रूग्ण समोर येत होते. शनिवारी गावात ८२ जणांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.नंतर रविवारी ५२ जणांना हाच त्रास जाणवू लागला.अवघ्या दोन दिवसांत १३६ जण आजारी पडल्याने आरोग्य विभागाचे पथक गावात तळ ठोकून आहे.रविवारी सायंकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी चिंचाळामध्ये गॅस्ट्रो नव्हे तर डिसेंट्री(हगवण) ची साथ असल्याचे स्पष्ट केले आहे.सध्या सर्व रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून यामुळे एकाचा ही मृत्यु झाला नसल्याचे डॉ.आर.बी.पवार यांनी म्हटले आहे.