देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात आरोग्य यंत्रणा गुंतल्या असताना म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. त्यातच आता कोरोनाच्या Delta सोबत Delta Plus Variant चे रुग्ण देखील काही भागामध्ये आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात अनेक दावे, प्रतिदावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “लहान मुलांमध्ये करोना आढळला, तरी ती बहुतेक वेळा असिम्पटोमॅटिक अर्थात लक्षणविरहीत असतात. सुदृढ मुलांनी रुग्णालयात दाखल न करताही अत्यंत सौम्य लक्षणांसह कोरोनावर मात केली आहे. सहव्याधी असणाऱ्या किंवा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या मुलांनाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते”, असं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी केंद्रीय व्यवस्थेतील अनेक तज्ज्ञांनी यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेचा यासाठी दाखला देण्यात आला आहे.
रुग्णालयात दाखल करण्याची वेळ…
निती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “बहुतेक वेळा लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या करोनाच्या प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणं नसतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ खचितच येते. काही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते, पण त्यांचं प्रमाण खूप कमी असू शकेल”, असं डॉ. पॉल यांनी सांगितलं आहे. १ जून रोजीच पॉल यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका मांडली होती. त्यासोबतच, “कोरोनाची लागण होण्याची शक्यता असणाऱ्या मुलांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या आरोग्य सुविधांची उभारणी करण्यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत”, असं देखील पॉल यांनी नमूद केलं होतं.
गंभीर परिणामांची कोणतीही माहिती नाही!
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पीआयबीच्या माध्यमातून जारी केलेल्या परिपत्रकामध्ये एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी ८ जून रोजी यासंदर्भात दिलेलं स्पष्टीकरण देखील नमूद केलं आहे. “भारत किंवा जगभरातून असा कोणताही डाटा मिळालेला नाही ज्यावरून हे सिद्ध होऊ शकेल की लहान मुलांवर करोनाच्या पुढच्या लाटांचा गंभीर परिणाम होईल. सुदृढ मुलं यावर सौम्य लक्षणांनीही मात करू शकतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत नाही”, असं गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे.
लहान मुलांवर लसीची चाचणी
दरम्यान, लहान मुलांना कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण देण्यासाठी कोवॅक्सिन लसीची चाचणी लहान मुलांवर सुरू करण्यात आली आहे. NTAGI गटाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी यासंदर्भात २५ जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे. “२ ते १८ या वयोगटातल्या मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी सुरू करण्यात आली आहे. या चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये हाती येतील. मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते पण ते गंभीर आजारी पडणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
गंभीर परिणामांची शक्यता कमी
लहान मुलांना असणाऱ्या कोरोनाच्या धोक्याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून तज्ज्ञांच्या मतानुसार भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांना करोनाची लागण जरी झाली, तरी ते गंभीररीत्या आजारी पडणार नाहीत किंवा त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही. सहव्याधी असणाऱ्या किंवा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या मुलांव्यतिरिक्त इतर मुलांवर कोरोनाचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता फारच कमी असल्याची भूमिका देशातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मांडण्यात येत आहे.