किल्लेधारूर- तालुक्यातील हिंगणी बुद्रुकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे.ऐन रमजान महिन्यात बाप-लेकाचा कोरोनाने मृत्यु झाला असल्याने गावभर शोककळा पसरली.शेख मदार (वय-७०) आणि त्यांचा मुलगा शेख रज्जाक (वय-४५) असे मृतांचे नावे आहेत.
धारुर तालुक्यात शेख रज्जाक यांची दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी स्वतः ग्रामपंचायत ताब्यात घेऊन सरपंच उपसरपंच दोन्ही पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी त्यांनी काम केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या जवळच्या परिचित कार्यकर्त्यात त्यांचा समावेश होता. रज्जाक यांचे वडिल शेख मदार (७०) यांचे कोरोनावर उपचार सुरु असताना चार दिवसांपुर्वीच निधन झाले. तर लातूर येथील खाजगी रुग्णालयात रज्जाक शेख यांच्यावर उपचार चालू होते
. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले. वडिलां पाठोपाठ चार दिवसांनी रज्जाक यांचीही कोरोनामध्येच प्राणज्योत मावळली. यामुळे त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सर्वत्र पवित्र रमजान व ईद साजरी होत असताना शेख कुटूंबावर काळाने घाला घातला. वडिलां पाठोपाठ एकुलता एक मुलगा असलेला चळवळीतला कार्यकर्ता कोरोनाने हिरावला. यामुळे हिंगणीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रज्जाक यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली एक मुलगा असा परिवार आहे.