बीड : राज्यात कोरोना लॉकडाऊनमुळे सामान्य जनता त्रस्त असताना आणि बंद काळात हेल्मेट मिळणे अवघड झालेले असतानाही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुन्हा एकदा मास्क आणि हेल्मेट सक्तीचे आदेश दिले आहेत . कोणत्याही परिस्थितीत हेल्मेट सक्ती राबवा असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कोरोना संदर्भाने सोमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हेल्मेट आणि मास्क सक्तीचे आदेश दिले होते . मात्र सध्या अनेकांकडे हेल्मेटच उपलब्ध नसल्याने अनेक जिल्ह्यात हेल्मेट सक्तीला जनतेचा विरोध होत आहे. हा विरोध लक्षात घेऊनच औरंगाबाद पोलिसांनी हेल्मेट सक्तीची कारवाई १५ मे पर्यंत पुढे ढकलली होती. मात्र उच्च न्यायालयाने यासंदर्भात पुन्हा पोलिसांवरच ताशेरे ओढले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हेल्मेट आणि मास्क आवश्यक असल्याचे सांगत जनतेला स्वतःला शिस्त नाही, म्हणून आम्हाला जनतेला शिस्त लावावी लागत आहे, जनतेच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत हेल्मेट सक्ती आणि मास्क सक्ती राबवा असे आदेश न्या. अरुण घुगे आणि न्या. बी. यु. देबडवार यांच्या पीठाने दिले आहेत. त्यामुळे आता मराठवाड्यासह शेजारच्या नगर जिल्ह्यातही हेल्मेट सक्ती होणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे पोलिसांचा ताण मात्र पुन्हा वाढणार आहे.
---
गॅस दाहिनी उभारा
यापूर्वी न्यायालयाने ठिकठिकाणी विद्युत दाहिनी उभारण्याचे आदेश दिले होते, त्यावर विद्युत दाहिनीचा प्रयोग खर्चिक असल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले होते, त्यामुळे आता प्रत्येक नगर पालिकेच्या समशानभूमीत गॅस दाहिनी उभारावी , यासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून खर्च करावा असे न्यायालयाने म्हटले आहे
---
प्रजापत्र | Monday, 10/05/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा