महाराष्ट्रात रोज 25 ते 30 हजार नवीन कोरोना रुग्णांची गुजरात सरकारने चांगलीच धास्ती घेतली आहे. आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार, आता कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट असल्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांना गुजरातमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. गुजरात सरकारने बुधवारी काढलेल्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.
उच्छल पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलिस दलाचे पथक तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांची तपासणी सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभाग व पोलिस दलाला देण्यात आले आहे.
कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे. अन्यथा महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छलहून महाराष्ट्रात परत पाठविण्यात येत आहे. गुजरात राज्यातील आरोग्य पथक 24 तास सीमावर्ती भागात वाहन चालकाची थर्मल स्कॅनिंग, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचा तपास करीत आहे.
कोविड निगेटीव्ह रिपोर्ट बाळगणे बंधनकारक
तोंडाला मास्क नसल्यास गुजरात पोलीस एक हजार रूपयांचा दंड महामार्गावर वसूल करीत आहे. महाराष्ट्र पासिंग फोर व्हीलर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे.जळगाव व धुळे जिल्ह्यातील अनेक वाहनचालकांचे कुठलेही कारण ऐकून न घेता परतीचा प्रवास करावा लागला आहे.
गुजरात राज्यात जाण्यासाठी कोरोना रॅपिड किंवा आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट असणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील लोक मोठ्या संख्येने गुजरात राज्यात कोरोनाचा उपचारासाठी जात असल्याने त्यांची मोठी फसगत होणार आहे. नवापूर सीमा तपासणी नाक्यावर रॅपिड टेस्टिंग चे कॅम्प लावण्याने गुजरात राज्यात जाणाऱ्यांची सोय होईल अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
चालकांनी काढली पळवाट
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील वाहनचालकांनी यावर वेगळीच शक्कल लढवली आहे. नवापुरात महाराष्ट्र पासिंग MH 39 नंदुरबार, MH18 धुळे, MH19 जळगाव अन्य जिल्ह्यातील गाड्या बदलून ते आता गुजरात पासिंगच्या गाड्या भाड्याने घेत आहेत. याच गाड्यांचा गुजरातमध्ये प्रवेश करण्यासाठी वापर केला जात आहे. अशा वेळी कार भाड्यांचे दर वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारली जाऊ शकत नाही.