Advertisement

पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली?; गृहमंत्री म्हणाले...

प्रजापत्र | Friday, 19/03/2021
बातमी शेअर करा

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटके त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक यामुद्द्यावरुन राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. तातडीने पवारांची भेटी घेतल्यानं अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, देशमुखांनी यांवर बोलणं टाळलं आहे. तर, पवार यांची भेट का घेतली याचं कारण स्पष्ट केलं आहे.

 

शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात आज तब्बल दीड तास चर्चा झाली. नागपुरातील मिहान प्रकल्पाविषयी चर्चेसाठी शरद पवारांची भेट घेतली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसंच, अंबानींच्या घरासमोर स्फोटकांबाबतही पवारांसोबत चर्चा झाली, असंही देशमुख म्हणाले आहेत.

 

अनिल देशमुख काय म्हणाले?

 

'विदर्भात, नागपुरात मिहान प्रकल्प सुरु आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या इंडस्ट्रींचा येण्याचा विचार आहे. त्यामुळे विदर्भात या इंडस्ट्री आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांसोबत चर्चा करण्यासाठी मी आलो होतो. पवार साहेबांना मिहान प्रकल्पाची माहिती दिली. त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर, मुंबईत सध्या घडत असलेल्या घडामोडींची पवार साहेबांसोबत चर्चा झाली. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची त्यांनी माहिती घेतली,' असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

'एनआयए आणि एटीएस या प्रकरणाचा सर्व तपास करत आहेत. त्यांना राज्य शासनाकडून सर्व मदत आम्ही करत आहोत. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. याचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, त्याची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई राज्य सरकार करेल,' अशी ग्वाही देशमुखांनी दिली आहे.
 

Advertisement

Advertisement