मुंबई - पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली,. तर कोमल जगदाळेने रौप्यपदक पटकावले. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रमही नोंदवला. २६ वर्षीय अविनाशने ८ मिनिटे २०.२० सेकंद अशी वेळ नोंदवताना २०१९ मधील स्वत:चाच विक्रम मोडीत काढला.
त्यावेळी, ८ मि. २१.३७ सेकंदात त्याने हे अंतर कापले होते. राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या पुत्राचं कौतुक केलंय. मूळच्या बीडच्या अविनाश साबळेकडून तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत पाचव्यांदा नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. पतियाळातल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत आठ मिनिटं २०.२० सेकंद वेळ देऊन त्याची सुवर्णपदकाची कमाई. अविनाशच्या या कामगिरीचा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राला अभिमान आहे. त्यामुळेच, धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटर अकांटवरुन अविनाश साबळेचं कौतुक केलंय.
अविनाश साबळेनं यापूर्वीही जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यानं 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात स्वतःचा नॅशनल रेकॉर्ड मोडला आणि जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. जागतिक स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवणारा अविनाश हा पहिलाच भारतीय पुरुष धावपटू ठरला होता. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाशचं धावण्याशी नातं जोडलं गेलं. त्याला रोज घर ते शाळा असा 6 किमीचा प्रवास पायी करावा लागायचा. 12 वीनंतर तो भारतीय सैन्यात 5 महार रेजिमेंटमध्ये रूजू झाला. 2013-14साली त्यानं सियाचिन ग्लेशियरवर पोस्टिंग केली.